सनदी लेखापाल महेश पाटणकर यांचा उपक्रम

पुणे : गणेशोत्सवासह विविध सणांना म्हटल्या जाणाऱ्या आरत्या आणि त्यातील शब्दांच्या विपर्यासामुळे निर्माण होणारे विनोद यामुळे अस्वस्थ झालेल्या सनदी लेखापाल महेश पाटणकर यांनी योग्य उच्चार आणि पारंपरिक चालीतील आरत्या ‘ऑनलाइन’ उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आरत्या म्हणाताना होणाऱ्या चुका टाळता येणार असून आरत्यांच्या पारंपरिक चालींचे जतन होणार आहे.

पाटणकर म्हणाले, की बरेच लोक चुकीच्या आरत्या म्हणतात. दरवर्षी गणपतीत बरेच लोक आरती संग्रह वाटतात. पण त्यामुळे फार काही फरक पडताना दिसत नाही. त्यामुळे अचूक शब्दातील, स्पष्ट उच्चारातील आणि पारंपरिक चालीतील आरत्या ध्वनिमुद्रित करून  इंटरनेटच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. वेदमूर्ती नारायण जोशी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संस्कृतच्या शिक्षिका मृदुला पाठक यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.

पारंपरिक चालीतील आरत्या महेश पाटणकर, प्रशांत कुलकर्णी, अनुराधा पाठक, विजय केळकर, यशश्री पुणेकर, धनंजय दीक्षित, सिद्धी दीक्षित, प्राची फाटक, तनुजा आपटे, मिलिंद पंचनदीकर, डॉ. मोहन उचगावकर, सारंग आठवले, सिद्धा पाटणकर यांनी म्हटल्या आहेत. त्यांना पं. जयराम पोतदार (ऑर्गन), अविनाश तिकोनकर (पखवाज), माधवी करंदीकर (संवादिनी), श्रीनंद मेहेंदळे (तबला), यशवंत देशपांडे (टाळ), अनिरुद्ध देसाई (सिन्थेसायझर) यांनी साथसंगत केली आहे.