नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका व २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमधील आकडेवाडी लक्षात घेतली, तर लोकसभेसाठी शहरी भागातून मोठय़ा प्रमाणावर मतदान होत असताना ग्रामीण भागातील विधानसभा मतदार संघांतून मात्र हव्या त्या प्रमाणात मतदान झाले नाही. विधानसभेला हे चित्र नेमके उलटे होते. त्या वेळी शहरातून कमी मतदान झाले असताना ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले होते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता यंदाच्या विधानसभा निवडणुकासाठी शहरी भागातून मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या वेळी जिल्ह्य़ातील ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे लोकसभा मतदार संघातून ५४.२४ टक्के मतदान झाले होते. बारामती मतदार संघातून ५८ टक्के, तर शिरूर मतदार संघातून ५९ टक्के मतदान झाले होते. विधानसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातून ६६.७२ टक्के मतदान झाले होते. तर शहरी भागातील मतदार संघातून केवळ ४५.७४ टक्के मतदान झाले होते. ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक मतदान इंदापूरमध्ये ७६.३८ टक्के झाले होते. तर बहुतांश मतदार संघामध्ये ६५ टक्क्य़ांहून अधिक मतदान झाले होते. पुणे लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विधानसभेच्या कोणत्याही मतदार संघांमध्ये ४५ टक्क्य़ांहून अधिक मतदान होऊ शकले नव्हते.
जिल्ह्य़ातील एकूण मतदानामध्ये मागील विधानसभेच्या तुलनेत लोकसभेमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली असली, तरी यंदाच्या विधानसभेत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. आघाडी व युतीतील पक्ष आता स्वतंत्र निवडणुका लढवीत असल्याने मतदान वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, यंदा निवडणूक आयोगाकडून ७५ टक्के मतदानाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे मतदानासाठी जागृती करण्यासाठी पत्रकांचे वाटप, मतदार जागृती फेरी त्याचप्रमाणे पथनाटय़ांचा वापर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. महाविद्यालय त्याचप्रमाणे माहिती-तंत्रज्ञान विभागातील कंपन्यांमधूनही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.