पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आज (शुक्रवारी) दुपारी श्री बालाजी फाऊंडेशनकडून आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश आणि आयआरएस अधिकारी भरत आंधळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभागृहात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्यावरही अनेक विद्यार्थ्यांना सभागृहाबाहेर राहावे लागले. यानंतर बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आयोजकांवर आली.

श्री बालाजी फाउंडेशनच्या वतीने आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश आणि आयआरएस अधिकारी भरत आंधळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दुपारी तीन वाजल्यापासून बालगंधर्व रंगमंदिरात विद्यार्थ्यांची गर्दी जमली होती. या सभागृहाची क्षमता ९९० आहे. मात्र या व्याख्यानाला दोन हजाराहून अधिक विद्यार्थी आले होते. यातील काही विद्यार्थ्यांना आत प्रवेश मिळाला. यामुळे बाहेर राहावे लागलेल्या नाराज विद्यार्थ्यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिल्पाक्षरांची तोडफोड केली. यावेळी बालगंधर्व रंगमंदिराच्या सुरक्षेसाठी केवळ चार सुरक्षारक्षक उपस्थित होते. सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने गर्दीपुढे त्यांचे काहीही चालले नाही. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आल्यावर परिस्थिती आटोक्यात आली.

‘कार्यक्रमादरम्यान सभागृहाचे झालेल्या नुकसानाची भरपाई करुन घेतली जाणार आहे. यासोबतच नोंदणीवेळी आकारण्यात आलेली पाच हजार रुपयांची अनामत रक्कमही जप्त करण्यात येणार आहे,’ अशी माहिती महापालिकेचे अधिकारी भरत कुमावत यांनी दिली आहे.
‘स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश आणि आयआरएस अधिकारी भरत आंधळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीमुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला,’ अशी माहिती श्री बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.मानसिंग साबळे यांनी दिली.