X

पुण्यात युवक काँग्रेसमधील निवडणुकीत राडा

निवडणुकांचा बुधवारी अखेरचा दिवस असल्याने शहरातील अनेक भागातील काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस भवन येथे मतदान करण्यासाठी उपस्थित होते.

पुण्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली असून युवक काँग्रेसमधील निवडणुकीत पक्षातील कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. हे प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचल्याने स्थानिक नेत्यांची नाचक्की झाली. निवडणुकीत आधार कार्ड ग्राह्य धरायचे की नाही यावरुन हा वाद झाला होता.

काँग्रेसमध्ये पक्षाच्या विविध पदांसाठी गेल्या दोन दिवसांपासून मतदान होत आहे. पुण्यातील काँग्रेस भवन येथे बुधवारी मतदानाच्या वेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी आधारचे स्मार्ट कार्ड ग्राह्य धरले नाही. त्यावरून निवडणूक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला.

निवडणुकांचा बुधवारी अखेरचा दिवस असल्याने शहरातील अनेक भागातील काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस भवन येथे मतदान करण्यासाठी उपस्थित होते. मतदान प्रक्रियेदरम्यान आधारकार्डची मागणी केली असता अनेकांनी ‘आधार’चे स्मार्ट कार्ड दाखवले. मात्र, ते निवडणूक अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरले नाही. आधार कार्ड असल्यावर मतदान करता येईल, असे सर्वांना सांगण्यात आले. त्यावरून कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. हे प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले.

अधिकाऱ्यांच्या हातातील टॅब हिसकावून घेण्यात आला. शेवटी निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली. या वादामुळे काँग्रेस भवन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

यावर काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की,काँग्रेस भवन येथे निवडणुकीवेळी काही झाले नाही, असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचे काम केले.