ओंकारेश्वर मंदिर चौकात अनेक रथ; नदीपात्रातील रस्त्यावर महाकाय अश्व

पुणे : विसर्जन मिरवणुकीत आकर्षण ठरलेले रथ आता वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहेत. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरासमोर अनेक मंडळांचे विसर्जन मिरवणुकीतील रथ लावल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अशाच प्रकारे अनेक रस्त्यांवर रथ उभे असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

विसर्जन मिरवणूक गुरुवारी (१२ सप्टेंबर) पार पडली. मिरवणूक पार पडल्यानंतर अनेक मंडळांनी शहरातील मध्यभागासह, उपनगरातील रस्त्यांवर रथ लावले. गेले चार दिवस हे रथ रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरासमोर दोन मोठे रथ लावण्यात आले आहेत. एक रथ देवी हाईट्स या इमारतीसमोर लावण्यात आला तर दुसरा रथ शनिवार पेठेतील वीर मारूती मंदिर रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आला आहे. चौकाच्या मधोमध दोन्ही रथ लावण्यात आल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना चौक ओलांडताना त्रास सहन करावा लागत आहे.

विसर्जन मिरवणुकीत यंदा अनेक मंडळांनी आकर्षक रथ तयार केले होते. मिरवणुकीनंतर  मंडळांकडून तयार करण्यात आलेल्या रथांचा वापर नवरात्रोत्सवात केला जातो. नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांकडून काही रक्कम घेऊन त्यांना हे रथ वापरण्यासाठी दिले जातात. शहर तसेच उपनगरातील गणेशोत्सवात तयार केलेले रथ रस्त्याच्या कडेला लावून ठेवण्यात आले आहेत. काही मंडळांनी त्यांचे रथ नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना वापरासाठी दिले आहेत. रस्त्याच्या क डेला लावलेल्या रथांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पादचाऱ्यांची विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

मंडळाविरोधात गुन्हा

एका मंडळाने साकारलेला महाकाय अश्व विसर्जन मिरवणुकीनंतर कर्वे रस्त्यावर खंडोजीबाबा चौक ते शेलारमामा चौक दरम्यान रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला होता. महाकाय अश्वामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होत होती. खंडोजीबाबा चौक ते शेलारमामा चौक दरम्यान कोंडी होत असल्याचे डेक्कन वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर वाहतूक शाखेतील पोलीस नाईक किशोर शिंदे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात मंडळा विरोधात तक्रार दिली. वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने रथ लावल्याने (भादंवि २८३) तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्वे रस्त्यावरील अश्व आता नदीपात्रातील रस्त्याच्या कडेला लावण्यात आला आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रथ लावण्यात आले आहेत. संबंधित मंडळांनी रथ काढून घ्यावेत, अन्यथा संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यां विरोधात भादंवि २८३ गुन्हे दाखल करण्यात येतील.

पंकज देशमुख, पोलीस  उपायुक्त, वाहतूक शाखा