08 March 2021

News Flash

पुण्याचं चित्र तीन आठवड्यात बदलण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

पुण्यातील परिस्थिती बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिला तीन आठवड्यांचा कालावधी

पुण्यातील करोना विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. पुण्यातील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील करोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनास तीन आठवड्याचा वेळ दिला आहे. तसेच विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांना पुण्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विषेश जबाबदारी सोपावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आदी या वेळी उपस्थित होते.

पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पुण्यातील कोरोना परिस्थितीत व भविष्यातील नियोजना संदर्भात सर्व प्रशासकीय आढावा घेतला. या आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, करोनाचे रुग्ण आणि मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील वाढत्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा वाढवण्यासाठी महापालिके नेच पुढाकार घ्यावा. तपासणी अहवाल सकारात्मक आलेले रुग्ण रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करतात. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून येत आहे. रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांनी करोना चाचणीचे अहवाल रुग्णांना परस्पर न देता महापालिके ला द्यावेत.

करोनाचा संसर्ग पुण्यात किती दिवसापासून वाढत आहे, हे पाहून त्यादृष्टिने जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात. शासकीय यंत्रणा प्रभावी होणे आवश्यक असून आरोग्य सुविधा सक्षम करावी. कोरोना रुग्णांसाठी अद्याप ठोस औषध अथवा लस उपलब्ध नसल्याचे सांगतानाच अशा परिस्थितीत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. करोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या हिताचे निर्णय घेताना सर्वांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. करोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.


मुख्यमंत्री म्हणाले, करोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या. त्यानंतर जम्बो रुग्णालयांच्या उभारणीनंतर व समन्वयातून यामध्ये सुसूत्रता आणण्यात यश आले आहे. पुण्यातही लवकरात लवकर जम्बो रुग्णालयांची उभारणी करावी, जम्बो रुग्णालयांच्या सुविधा निर्माण झाल्यानंतर रुग्णांची बेडसाठी होणारी गैरसोय टळेल. तसेच करोनाला रोखण्यासाठी यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. करोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण आहे. ते कमी झाले पाहिजे तसेच करोना चाचण्यांचे अहवाल यायला विलंब होत आहे, ही गंभीर बाब असून अहवाल वेळेत प्राप्त होतील, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

महापालिकेचे प्रभाग अधिकारी हे प्रशासनाचा कणा असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहराला करोनामुक्त करण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांनी जागरुकपणे व जबाबदारीने काम करावे तसेच प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याने आपल्या प्रभागात करोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी घ्यावी, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल. नागरिकांच्या मनात भीती आहे, ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने जनजागृती करावी, तसेच प्रतिबंधित क्षेत्रात बंधने पाळली जातील व नियमांची अत्यंत काटेकार अंमलबजावणी होईल, याबाबत दक्ष राहण्यासोबतच रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या कामांत अजिबात ढिलाई नको, असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 9:28 am

Web Title: cm gives pune three weeks to change status nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आर्थिक मदतीकडे दुर्लक्ष?
2 Coronavirus : जुलैमध्ये जिल्ह्य़ात ५५,५८४ नवे रुग्ण
3 पुरंदर, पारनेरमधील गोड चवीच्या मटारचा हंगाम सुरू
Just Now!
X