News Flash

परीक्षा घ्यायच्या की समारंभ करायचे – महाविद्यालयाकडून विद्यापीठाला सवाल

विद्यापीठाच्या परीक्षांची कामे करायची की पदवीदान समारंभ असा प्रश्न प्राचार्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ महाविद्यालयांच्या स्तरावर घेण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. मात्र विद्यापीठाच्या परीक्षांची कामे करायची की पदवीदान समारंभ असा प्रश्न प्राचार्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठाचा पदवीदान समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि विद्यापीठाचे अव्यवस्थापन असेच समीकरण गेली काही वर्षे समोर येत आहे. विद्यापीठात होणाऱ्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर यावर्षीपासून पदवीस्तरावरील पदवीदान समारंभ विद्यापीठाने महाविद्यालयांच्या गळ्यात टाकला. विद्यापीठाचा मुख्य समारंभ येत्या मंगळवारी (२२ मार्च) होणार आहे. पीएच.डी., सुवर्णपदके आणि पारितोषिकांचे वाटप या समारंभात केले जाणार आहे, तर पदव्युत्तर प्रमाणपत्रांचे वाटप या दिवशी विद्यापीठाच्या आवारात करण्यात येणार आहे. मात्र यावर्षी पदवी आणि पदविका प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी महाविद्यालयांची राहणार आहे.
महाविद्यालयांनी २८ मार्च ते २० एप्रिल या कालावधीत पदवीदान समारंभाचे आयोजन करावे अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. मात्र याच दरम्यान विद्यापीठांच्या परीक्षाही सुरू आहेत. विज्ञान, कला शाखेच्या पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा आहेत. पदवीदान समारंभाची प्राथमिक तयारी, पाहुणे निश्चित करून त्यांना बोलावणे, विद्यार्थ्यांना पुरेशी आधी माहिती देणे असा सगळा जामानिमा महाविद्यालयांनी करायचा आहे. त्यामुळे पदवीदानासाठी समारंभ आयोजित करताना महाविद्यालयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
याबाबत एका प्राचार्यानी सांगितले, ‘बहुतेक महाविद्यालयांकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यातच परीक्षेच्या कामांत मनुष्यबळ गुंतलेले असते. या दरम्यान काही सार्वजनिक सुट्टय़ाही आहेत. नवे वर्ष तोंडावर असल्यामुळे त्याची तयारी, भरतीप्रक्रियाही काही ठिकाणी सुरू आहे. परीक्षांचे आणि महाविद्यालयाच्या रोजच्या कामकाजाचे वेळापत्रक सांभाळून विद्यापीठाने ठरवून दिलेल्या दिवसांमध्ये पदवीदान समारंभ घेणे कठीण आहे.’
समारंभ आम्ही करायचा, शुल्क मात्र विद्यापीठाला?
पदवीदान समारंभासाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्कातील काही रक्कम ही महाविद्यालयांनी विद्यापीठाला द्यायची आहे. मुळात समारंभ आम्ही आयोजित करायचा, खर्च आम्ही करायचा आणि बहुतेक शुल्क विद्यापीठाला द्यायचे, असे का? असा प्रश्नही महाविद्यालयांकडून विचारण्यात आला.
प्रमाणपत्रांचे स्वरूप बदलले
विद्यापीठाने यावर्षीपासून प्रमाणपत्रांचे स्वरूप बदलले आहे. केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये (आयआयटी, आयआयएम) दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राप्रमाणे आकर्षक स्वरूपात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. हे नवे प्रमाणपत्र पदवीदान समारंभाचे आकर्षण ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2016 2:38 am

Web Title: college ask university
टॅग : College
Next Stories
1 जर्मन बेकरीसह देशभरातील बाँम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरूच
2 – परीक्षा संपण्यापूर्वीच निकालाच्या तारखांच्या अफवा
3 सत्ताधारी पक्षाकडूनच ‘घरचा आहेर’; कारभाराचा ‘पंचनामा’
Just Now!
X