“हिंदू, हिंदुत्व आणि हिंदुस्थान ही संकल्पना देशासाठी घातक आहे. मी देखील हिंदू असून देशासाठी हिंदू हा एक धर्म आहे. परंतु भाजपाची हिंदुत्व ही राजकीय विचारधारा असताना, आपल्या देशात मागील काही महिन्यांमध्ये जमावाकडून झालेल्या झुंडशाही(मॉबलिचिंग) सारखी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्या माध्यमातून हा हिंदू धर्माचा आणि प्रभू श्री रामाचा अपमानच आहे”, अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी मांडली. यावेळी बोलताना त्यांनी प्रभू श्रीराम यांनी देशाला ही शिकवण दिली आहे का?असा सवाल उपस्थित केला. तसंच, आगामी काळात आर्थिक स्थिती खूप भयानक होईल आणि देश कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येणार नाही, असंही ते म्हणाले.

पुण्यात काँग्रेस भवन येथील कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शशी थरूर पाकव्याप्त काश्मीरबाबत बोलताना म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये 75 टक्के नागरिक पंजाबी असून तेथील सद्य परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानला त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले. “परंतु, काश्मीरमध्ये मोदी सरकारने 370 कलम ज्या पद्धतीने हटवले त्याबाबत आम्ही त्यांना प्रश्न विचारणारच आणि त्यांना त्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा चर्चेला येईल. तेव्हा आम्ही त्याचं समर्थन करु. एक इंच जमीन सुद्धा पाकिस्तानला देणार नाही, यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत. मात्र, देशाच्या आतमध्ये आम्ही खुश नाही”, असं यावेळी थरुर यांनी स्पष्ट केले.  तसंच, “भारताच्या हितासाठी जेव्हा देशाचे पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा त्यांना योग्य सन्मान मिळालाच पाहिजे. कारण ते आपल्या देशाचा झेंडा घेऊन बाहेर जात असतात. जेव्हा ते देशात येतात तेव्हा तुम्ही देशासाठी काय केले याचा जाब देखील विचारायला हवा. पण, विदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान केला, तर ते आम्ही सहन करणार नाही. कारण ते विदेशात देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे काम करतात.”, असंही थरूर यांनी नमूद केले.

मोदी साहेब आता तरी ‘जन आणि धन की बात’ बोला : शशी थरूर

“देशासमोर मंदीचे संकट असून अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यावर सरकारकडून कोणताही मंत्री पुढे येऊन बोलण्यास तयार नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून दर महिन्याला सुरू केलेली ‘मन की बात’ आज देखील सुरू आहे. पण, त्या दरम्यान देखील मंदीबाबत एक शब्द त्यांनी काढला नाही. अहो मोदी साहेब, ‘मन की बात’ऐवजी ‘जन आणि धन की बात’ बोला”, अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस (AIPC) पुणे यांच्यावतीने थरूर यांचे राष्ट्रनिर्मितीमध्ये व्यावसायिकांचा सहभाग या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार रमेश बागवे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी खासदार शशी थरूर म्हणाले की, “आगामी काळात आर्थिक स्थिती खूप भयानक होणार असून त्यातून सरकारने जनतेला बाहेर काढण्याची गरज आहे. पण सद्य स्थितीला तसे काही होताना दिसत नाही. यामुळे आपला देश कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येणार नाही”, असे ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “देशात 2014 साली झालेल्या निवडणुकीनंतर काही व्यक्तींना एवढी ताकद आली की, आपण आता काही करू शकतो. आपल्याला कोणी काही करू शकणार नाही. यातून मागील पाच वर्षात देशभरातील अनेक भागात जय श्री राम न म्हणणार्‍या व्यक्तींना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे निष्पाप नागरिक एका शक्तीच्या बळी ठरल्या आहेत. या घटनांकडे सर्वांनी गांभीर्याने पाहण्याची गरज असून प्रभू श्रीराम यांनी देशाला ही शिकवण दिली आहे का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. “सरदार पटेल यांनी केलेले काम सर्वांना माहिती आहे. भाजपाने त्यांच्याबाबत आम्हाला सांगण्याची गरज नाही”, असेही ते पुढे म्हणाले.