“पुण्यातील काँग्रेस भवनच्या तोडफोडीबद्दल मला काहीच कल्पना नाही. मी तीसऱ्यांदा आमदार झाल्याने मला मंत्रीपदाची इच्छा होती मात्र घडलेला तोडफोडीचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. घडलेली तोडफोड ही काही माझ्या सांगण्यावर झालेली नसल्याने मला कारवाईची चिंता नाही,” अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेसचे भोर येथील आमदार संग्राम थोपटे यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने थोपटे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये तोडफोड केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कार्यकर्त्यांच्या जमावाने काँग्रेस भवनवर जोरदार दगडफेक करून तोडफोड केल्याने काँग्रेस भवनात सर्वत्र काचांचा खच पडला होता.

तोडफोडीबद्दल काय म्हणाले थोपटे?

पुण्यामधील काँग्रेस भवनच्या तोडफोडीचा थोपटे यांनी निषेध केला. “जे झालं ते चुकीचं आहे. त्याचं मी समर्थन करु शकत नाही. तोडफोड ही काँग्रेस पक्षाची परंपरा नाही. काँग्रेस हा अहिंसावादी विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे घडलेला प्रकार हा चुकीचाच आहे. काँग्रेस भवनावर कोणी दगडफेक केली यासंदर्भातील वास्तुस्थिती तपासली पाहिले. तोडफोड आणि दगडफेक करणारे कार्यकर्ते शहरी भागातील होते की ग्रामीण हे तपासावे लागेल. आमची बदनामी करण्यासाठी विरोधी पक्षातील कोणी हे कटकारस्थान केलं आहे का? याचाही आम्ही शोध घेत आहोत,” असं थोपटे म्हणाले.

थोपटे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज?

मंत्रीपद न मिळाल्याने थोपटेंच्या समर्थकांनी तोडफोड केल्याचे सांगितले जात आहे. मात्र मंत्रिपदाबद्दल बोलताना थोपटे यांनी, “मंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जातो. मंत्रिपदाची इच्छा प्रत्येकालाच असते. तीसऱ्यांदा आमदार झाल्याने मलाही मंत्रिपदाची अपेक्षा होती. पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि तो मला मान्य आहे. मात्र मला मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील. मात्र त्यामुळे अशाप्रकारे तोडफोड करुन उद्रेक करणं चुकीचं आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – पुणे काँग्रेस भवनाची काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनच तोडफोड

कारवाई झाली तर?

याप्रकरणाची मला काही कल्पनाच नसल्याने माझ्यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही असंही थोपटे म्हणाले आहेत. “मला मंत्रीपद का देण्यात आलं नाही याबद्दल मला ठाऊक नाही. मात्र मंत्रिपदासाठीचे काही नियम ठरलेले असता. मंत्रिमंडळामध्ये मला स्थान देण्यात आलं असतं तर मतदारसंघाचा अधिक जोमाने विकास करता आला अशता. घडलेली तोडफोड ही काही माझ्या सांगण्यावर झालेली नाही त्यामुळे माझ्यावर कारवाई होण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावरील करण्याची मागणी होत असल्याची कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. माझ्याविरोधात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होत आहे हे ही मला ठाऊक नाही. मी पक्षाचा आदेश मानणारा सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला कारवाईची चिंता नाही. यासंदर्भात आपले म्हणणे मी पक्ष स्तरावर मांडेल,” असं थोपटे यांनी स्पष्ट केलं आहे.