पुणे काँग्रेस भवनाची काँग्रेस कार्यकर्त्यांकडूनच तोडफोड

संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्याने समर्थक आक्रमक

पुण्यातील काँग्रेस भवनात जबरदस्त तोडफोड करण्यात आली आहे. संग्राम थोपटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुणे काँग्रेस भवनावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच हल्लाबोल केला. तेथील खुर्च्यांची आणि टेबलांची तोडफोड केली. या ठिकाणी संग्राम थोपटे जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. संग्राम थोपटे यांनी पक्षासाठी मेहनत घेतली तरीही त्यांना डावलण्यात आलं असा आरोप थोपटे यांच्या समर्थकांनी केला. संग्राम थोपटे आमचं आशास्थान आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं म्हणून आम्ही काँग्रेस भवन फोडलं असं युवा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

आगामी काळात काँग्रेस जिल्ह्यातून संपवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी घोडेबाजार करुन मंत्रिपदं वाटली असाही आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी शब्द पाळला नाही. आमच्यावर झालेल्या अन्यायाचा आज उद्रेक झाला असंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाचे भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिपद न दिल्याने, आज पुण्यातील काँग्रेस भवन कार्यालयाची संग्राम थोपटे समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापुढे जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार करू असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

काँग्रेस भवनची तोडफोड करणं अत्यंत चुकीचं आणि निषेधार्ह आहे. या काँग्रेस भवनाची तोडफोड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असं रमेश बागवे यांनी म्हटलं आहे. प्रकाश पवार यांच्या नावाची पाटीही थोपटे यांच्या समर्थकांनी फोडून टाकली. घटनास्थळी पोलीस आले त्यानंतर त्यांनी थोपटे यांच्या समर्थकांना पांगवलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Congress party workers vandalized congress bhavan office in pune scj

ताज्या बातम्या