बुधवारी(दि.२०) झालेल्या मंदिर दुर्घटने प्रकरणी ठेकेदारास सांगवी पोलिसांनी अटक केली असून जेरबंद केलं आहे.राहुल जयप्रकाश जगताप असं ठेकेदाराचे नाव आहे. त्याला पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग यांनी सदरचे मंदिर हे अनधिकृत असल्याने नोटीस बजावली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने मंदिराचे बांधकाम सुरू ठेवले होते. तेव्हा सभामंडप कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत.
सविस्तर माहीती अशी की, बुधवारी दुपारी पाऊणे चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे नदी काठेवर महादेव मंदिराच्या बांधकाम जीर्णोद्धाराचे काम सुरू होते. काही मजूर हे मंदिरात दगड आणून टाकत होते तर काही जण सभामंडपाला आधार दिलेले लोखंडी रॉड आणि लाकडी बांबू काढून घेण्याचे काम करत होते. त्याच वेळी अचानक सभामंडम मजुरांच्या अंगावर कोसळला यात १२ कामगार अडकले होते. त्यातील तीन मजुरांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, यात एका महिलेचा समावेश होता. तर ऐकूण नऊ मजूर जखमी झाले होते. याप्रकरणी ठेकेदार राहुल जयप्रकाश जगताप याच्यावर मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कामगारांना हेल्मेट,सेफ्टी शूज,सेफ्टी जाळी दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. त्यामुळे जगताप याला सांगवी पोलिसांनी जेरबंद केलं आहे. अधिक तपास सांगवीचे पोलीस उपनिरीक्षक निकुंभ हे करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 4:28 pm