जिल्ह्य़ातील ६१ टक्के  रुग्ण ठणठणीत

पुणे : रविवारी पुणे जिल्ह्य़ातील रुग्णसंख्येने २८,५९९ चा टप्पा गाठला असून त्याचवेळी १७,३२९ रुग्ण संपूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे जिल्ह्य़ातील रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण  राज्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्य़ाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्के  आहे.

रविवारी राज्यातील रुग्णसंख्या दोन लाख सहा हजार ६१९ वर जाऊन पोहोचली आहे. त्यांपैकी एक लाख ११ हजार ७४० रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. संपूर्ण राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०८ टक्के  असल्याचे दिसून आले आहे.  पुण्याबरोबरच राज्यात मुंबईतील करोना रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते, मात्र मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ६४ टक्के  असल्याचे दिसून आले आहे. करोनाबाबत मोठय़ा प्रमाणावर जनजागृती, रुग्ण लवकरात लवकर उपचारांसाठी येण्याचे वाढते प्रमाण तसेच डिस्चार्ज बाबत बदलत्या मार्गदर्शक सूचना यांमुळे रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याचे दिसत आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे  देण्यात येत आहे.

रुग्णकेंद्रित उपचारांचा वापर

पुणे महापालिके चे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, रुग्ण बरे होऊन जाण्याचे सर्वाधिक प्रमाण पुणे शहर आणि जिल्ह्य़ात आहे. याचे कारण रुग्णांचे निदान झाल्यानंतर त्यांना सर्वात चांगले उपचार उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या डिस्चार्ज धोरणाचे पालन करत आहोत, त्यामुळे सौम्य किं वा अजिबात लक्षणे नसलेले रुग्णही घरगुती विलगीकरणाचे शिक्के  मारून घरी सोडण्यात येत आहेत.