X

कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण: पोलिसांकडून दोघे अटकेत

बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापुरातून ८९ लाख रूपये काढले

कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करून ९४ लाखांची रोकड लुटप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी भिवंडी आणि औरंगाबाद येथून दोघांना अटक केली. आरोपींनी ९५ बनावट डेबिटकार्डद्वारे (क्लोन) कोल्हापूर येथील एटीएम केंद्रातून ८९ लाख ४७ हजार ५०० रूपये काढल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने दोघांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

फहिम मेहफूज शेख (वय २७ रा. नुरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी) आणि फहीम अझीम खान (वय ३०, रा.आझादनगर, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सुहास गोखले यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. कॉसमॉस बँकेचे मुख्यालय गणेशखिंड रस्त्यावर आहे. बँकेच्या सर्व्हरवर हॅकरने हल्ला करून गेल्या महिन्यात ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान ९४ कोटी ४२ लाखांची रोकड लुटून नेली होती. त्यापैकी अडीच कोटी रक्कम देशातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. ४१३ बनावट डेबिट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८०० व्यवहार करण्यात आले होते. तर १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे करण्यात आले होते.

या गुन्हयाचा तपासासाठी सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. मुंबई, इंदूर, कोल्हापूर येथील एटीएम केंद्रात मिळालेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. चित्रीकरणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत होता. शेख आणि खान यांन कोल्हापूरातून पैसे काढण्यासाठी ९५ बनावट डेबिट कार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी बनावट डेबिट कार्ड (क्लोन) कशी तयार केली. त्यांना याबाबतचे तंत्रज्ञान कोणी दिले. बँकेचा डाटा कसा मिळविला तसेच बँकेचा सर्व्हर हॅक करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती कोणी दिली, यादृष्टीने तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने दोघांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पाच साथीदारांचा शोध सुरू

या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी खान आणि शेख यांनी पाच साथीदारांशी संगनमत करून ११ ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते रात्री दहा यावळेत बनावट डेबिटकार्डद्वारे ८९ लाख ८७ हजार ५०० रूपये काढल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. कोल्हापुरातील एयू स्मॉल फायनान्स, सारस्वत बँक, एसव्हीसीएल, एचडीएफसी, अ‍ॅक्सीस, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, राजाराम बापू सहकारी बँकेच्या एटीएम केंद्रातून रोकड काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी ९५ बनावट डेबिट कार्डचा वापर करण्यात आला आहे. आरोपींच्या पाच साथीदारांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, काही खातेदारांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा झाली होती. अशा २७ खातेदारांकडून सायबर गुन्हे शाखेने ३ लाख ५५ हजार रूपये जप्त केले आहेत.