महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये विस्तार करण्याचा प्रस्ताव असून कार्यवाहांच्या जोडीला आता सहकार्यवाह पदाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने जनसंपर्क विभागासाठी स्वतंत्र कार्यवाह नेमण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात येणार असून परिषदेच्या घटना दुरुस्ती समितीची दुसरी बैठक कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झाली. यामध्ये पदाधिकाऱ्यांसंदर्भातील मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. सध्या सहा जण स्थानिक कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. भविष्यामध्ये यातील दोन कार्यवाह हे पुण्याबाहेरील जिल्ह्य़ाचे असावेत. त्यांच्याकडे वार्षिक ग्रंथ पारितोषिके आणि परीक्षा विभाग ही जबाबदारी सोपवावी ,या प्रस्तावावर चर्चा झाली. त्याबरोबरच जनसंपर्क विभागासाठी स्वतंत्र कार्यवाह नियुक्त करावा असेही मत व्यक्त झाले. या कार्यवाहांच्या जोडीला सहकार्यवाहपदाची निर्मिती करावी. हे दोन सहकार्यवाह पुण्याबाहेरचे असतील. त्यांच्याकडे विभागीय संमेलन आणि शाखा व्यवस्थापन या जबाबदाऱ्या सोपविण्यासंदर्भात चर्चा झाली, अशी माहिती परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी दिली.
परिषदेची निवडणूक पद्धती कशी असावी याविषयी प्राथमिक चर्चा झाली. मतपत्रिका वेळेत न मिळण्याच्या तक्रारीसह मतपत्रिकांची पळवापळवी यांसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी नाटय़ परिषदेच्या धर्तीवर मतदान घेण्यात यावे असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. मात्र, या विषयावरील चर्चा अद्याप पूर्णत्वास गेली नसल्याने कोणताही प्रस्ताव झालेला नाही. समितीची पुढील बैठक २८ जुलै रोजी होणार आहे, असेही पायगुडे यांनी सांगितले.