१८ संस्थांमधील ७५० कलाकारांचा सहभाग

भरतनाटय़म्, कथक, कथकली, ओडिसी, कुचिपुडी यांच्या एकत्रित नृत्यशैलीचा मिलाफ आणि नृत्याविष्कार पुणेकर रसिकांना शनिवारी पाहायला मिळाला.  साडेसातशे नृत्य कलाकारांच्या नृत्याविष्काराची अनुभूती रसिकांनी या कार्यक्रमात घेतली. नवभारत निर्मिती संकल्प सिध्दीतर्फे साडेसातशे अभिजात नृत्य कलाकारांच्या साधनेचा आविष्कार असलेल्या नृत्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

गुरू मनीषा साठे, सुचेता चापेकर, शमा भाटे, निलिमा अध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा संस्थांमधील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यामध्ये नृत्यभारती, मनिषा नृत्यालय, नादरुप, कलावर्धिनी, नूपुरनाद, नृत्योन्मेष या संस्थांचा यामध्ये सहभाग होता.

कार्यक्रमाचे समन्वयक योगेश गोगावले म्हणाले,की समाजजीवनाचे प्रत्येक अंग प्रोत्साहित करणे, त्यांना बळ देणे आणि एक परिपूर्ण समाजाची निर्मिती हा  नवभारत निर्मितीचा अविभाज्य भाग आहे. शास्त्रीय नृत्याचा प्रचार गेली अनेक वर्षे होत आहे. त्याची ओळख पुणेकर रसिकांना होण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावर्षी रसिकांचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षांपासून तीन दिवसीय नृत्योत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

भारतातील नृत्य ज्या ज्या प्रदेशात स्थिरावले त्या प्रदेशाची भाषा, संगीत आणि त्याच्याशी निगडित असलेली देहबोली असलेल्या प्राचीन ओडीसी, कुचिपुडी, मणिपुरी, मोहनीअट्टम या नृत्यशैलीचे सादरीकरण या वेळी झाले.