सायबर भामटय़ांकडून लाखोंची फसवणूक
सायबर भामटय़ांकडून सामान्यांना लुबाडण्याचे सत्र शहरात विविध पद्धतींनी सुरूच आहे. परदेशातून भेटवस्तू पाठविणे, लॉटरी लागल्याचे आमिष दाखवणे या पद्धतीने भामटे हातोहात गंडा घालत आहेत. कोथरुड, वाकड आणि वडगांव शेरी येथे सायबरभामटय़ांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांना सत्तावीस लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोथरुडमधील डहाणूकर कॉलनीत राहणाऱ्या अश्विनी मधुकर कुलकर्णी (वय ४०) यांना काही दिवसांपूर्वी व्हॉटसअॅपवर एक संदेश आला होता. ज्या मोबाईल क्रमांकावरून त्यांना संदेश आला होता त्या व्यक्तीने त्याचे नाव हॅरी केन असे सांगितले होते. त्याने परदेशातून भेटवस्तू पाठविण्यात येणार आहेत, असे आमिष कुलकर्णी यांना दाखविले होते. भामटय़ांनी दाखविलेल्या आमिषाला त्या बळी पडल्या. त्यानंतर सिमरन असे नाव सांगणाऱ्या एका महिलेने मोबाईलवरून कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला आणि भेटवस्तूंचे पार्सल विमानतळावरून आणण्यासाठी काही शुल्क भरावे लागेल, अशी बतावणी केली. तिने सांगितलेल्या खात्यात कुलकर्णी यांनी एक लाख सतरा हजार ९५० रुपये भरले. त्यानंतर मात्र कुलकर्णी यांना भेटवस्तू मिळाल्या नाहीत. वस्तू न मिळाल्यामुळे या प्रकाराबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अलंकार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. जी. मिसाळ यांनी ही माहिती दिली.
कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हॅरी केन आणि सिमरन यांच्याविरुद्ध फसवणूक आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान थेरगांव परिसरातील रहिवासी तुषार कुलकर्णी (वय ४१) यांनाही भामटय़ांनी २३ लाख ९६ हजार ९०६ रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे. याप्रकरणी अॅरिस जॉनसन आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुलकर्णी यांना गेल्या वर्षी अॅरिस आणि त्याच्या साथीदारांनी लकी ड्रॉमध्ये निवड झाल्याचे आमिष दाखविले होते. त्यापोटी तीन कोटी ३५ हजार रुपये बक्षीस देण्याचे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. त्यानंतर भामटय़ांनी त्यांचा विश्वास संपादन केला आणि वेगवेगळ्या खात्यात पैसे भरण्यास सांगितले.
गेल्या वर्षभरात कुलकर्णी यांच्याकडून भामटय़ांनी २३ लाख ९६ हजार ९०६ रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कुलकर्णी यांनी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दिला. अर्जाची पडताळणी करण्यात आल्यानंतर गुन्हा वाकड पोलिसांकडे सोपविण्यात आला.
फेसबुकवरची ओळख महागात पडली
वडगांव शेरी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला फेसबुकवर झालेली ओळख महागात पडली आहे. शैलजा सुमन यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फ्रँक डॉमिनिक आणि त्याच्या दोन साथीदारांविरु द्ध या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची १२ मे रोजी फेसबुकवर फ्रँक डॉमिनिक याच्याशी ओळख झाली होती. काही काळानंतर डॉमिनिक याने स्कॉटलंडहून भेटवस्तू पाठवण्याचे आमिष शैलजा यांना दाखवले आणि एक लाख ३५ हजार रुपये भरण्याची सूचना दिली. एका बँकेच्या खात्यात त्यांनी हे पैसेदेखील भरले. भेटवस्तू न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार नोंदविली.
नायजेरियन फ्रॉड
भेटवस्तू पाठविणे आणि लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक क रण्यात नायजेरियातील भामटे तरबेज मानले जातात. अशा प्रकारच्या फसवणुकीच्या गुन्ह्य़ांना नायजेरियन फ्रॉड असे म्हटले जाते. मध्यंतरी पुण्यातील एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एका नायजेरिन नागरिकाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीत पकडले होते. या भामटय़ाने देशभरात शंभरजणांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले होते.