19 September 2020

News Flash

जगणे आनंदी, सकारात्मक अन् कार्यमग्न करा..!

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे उद्या ९९ व्या वर्षांत पदार्पण

संग्रहित छायाचित्र

अभिजित बेल्हेकर

कुठल्याही संकटाचा सामना करायचा असेल तर प्रत्येकाने पहिल्यांदा आपले जगणे आनंदी, सकारात्मक आणि कार्यमग्न करायला हवे. हे ज्यांना जमते ती माणसे कायम ‘तरुण’ आणि निरोगी राहतात.. ही भावना व्यक्त केली आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी!

शिवशाहीर उद्या नागपंचमीला ९९ व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. या निमित्ताने ते ‘लोकसत्ता’शी बोलत होते. या संवादाला सध्याच्या करोना संकटाचीही किनार होती.

करोनाचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले,‘मानव जातीवर अशी अनेक संकटे यापूवीही आलेली आहेत. परंतु त्या त्या वेळी समाजाने धैर्याने त्याचा सामना केला. मी स्वत: प्लेगच्या तब्बल पाच साथी अनुभवल्या. अतिसार, घटसर्प, ‘स्वाइन फ्लू’ पाहिले. या प्रत्येक वेळी काळजी घेतली, पण भीतीने पछाडले असे कधी झाले नाही आणि तसे होऊ ही दिले नाही. जगण्यावरचे प्रेम, श्रद्धा निरंतर असू द्या. त्यातली ऊ र्जा वाहती ठेवा. असे केले तरच ते जगणे आनंदी होईल.’

शताब्दीला अवघी दोन घरे बाकी असण्याचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले,‘तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्यात दडलेल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला जिवंत ठेवा. मी आजही या वयात जेवढा धीरगंभीर, चिंतनशील, स्थितप्रज्ञ वाटतो तेवढाच खोडकर, थट्टेखोर आणि दंगेखोर देखील आहे. मी जसे वाचन-संशोधन करतो तसेच पत्तेही खेळतो. हातात असलेले ‘पुलं’चे ‘खिल्ली’ पुस्तक दाखवत, हे असे आनंद देणारे साहित्यही वाचतो. आनंदाने जगणे ही देखील एक कला आहे. कशाचीही भीती बाळगू नका. संकटे येणार, ती चुकणार नाहीत. मरणावर विजय मिळवा, जगणे सुसह्य़ होईल. मी एवढय़ा प्रदीर्घ आयुष्यात एकदाही आजारी पडलो नाही. याचे रहस्य माझ्या शरीरापेक्षा या विचारांमध्ये असावे. आजवर सतत आनंदी, सकारात्मक आणि कार्यमग्न राहिलो. माझा भवतालही सतत हसता, आनंदी ठेवला. या प्रदीर्घ वाटचालीचे श्रेय कदाचित या ‘चैतन्या’लाच असेल! ’

निरंतर  संशोधन : ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या शब्दांभोवतीच आपले सबंध आयुष्य वेचलेल्या बाबासाहेबांचे संशोधन आणि अभ्यासाचे काम ९८ व्या वर्षांतही अखंड सुरू आहे. सध्याच्या करोना स्थितीमुळे पुरंदरे वाडय़ावरील त्यांचा मुक्काम तात्पुरता अन्यत्र हलवला आहे. सोबतीला खूप सारी पुस्तके  आणि संशोधनाचे कागद आहेत. बखरी, चरित्रे आणि शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रे..या साऱ्यांची पुन्हा उजळणी करत त्या १७ व्या शतकाचे शोधकार्य आजही अखंड सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 12:02 am

Web Title: debut of shivshahir babasaheb purandare in 99th year tomorrow abn 97
Next Stories
1 Coronavirus : पुण्यात एकाच दिवसात ३६ रुग्णांचा मृत्यू, पिंपरीत २१ जणांचा मृत्यू
2 बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादातून मित्राचा केला खून, आरोपी जेरबंद
3 पुण्यात उद्यापासून लॉकडाउन नाही पण निर्बंध कायम
Just Now!
X