‘पुणे बुक फेअर’ २८ सप्टेंबरपासून

पश्चिम भारतातील सर्वात मोठे ग्रंथ प्रदर्शन अशी ख्याती असलेले ‘पुणे बुक फेअर’ यंदा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आले आहे. माहिती, आरोग्य, व्यवस्थापन, व्यवसाय, कायदा, धर्म, राजकारण, साहित्य अशा विविध विषयांवरील मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत आणि इंग्लिश भाषेतील सुमारे पन्नास हजार पुस्तके एका छताखाली उपलब्ध होणार आहेत.

पुणे बुक फेअरतर्फे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, ग्रंथालय संचालनालय, पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, पुणे मराठी ग्रंथालय आणि खरिदो बेचो ऑनलाइन बुक सव्‍‌र्हिसेस यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. देशातील आणि परदेशातील नामवंत पुस्तक विक्रेते, वितरक, प्रकाशन संस्था, शैक्षणिक संस्था, सरकारी प्रकाशन संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनाचे यंदा १८ वे वर्ष आहे, असे प्रदर्शनाचे संयोजक पी. एन. आर. राजन यांनी मंगळवारी सांगितले.

राजन म्हणाले, तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तके तसेच ऐतिहासिक ऐश्वर्य दाखविणारी, त्या काळातील सामाजिक परिस्थिती, पूर्वजांचे पराक्रम दाखविणारी अनेक पुस्तके पुणे मराठी ग्रंथालयातर्फे मांडण्यात येणार आहेत. ब्रेल लिपीतील पुस्तके, शैक्षणिक साहित्य, आघाडीची वृत्तपत्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. छोटे प्रकाशक आणि विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.