पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. परंतु, गणेश भक्तांना विसर्जन करताना महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा सामना करावा लागल्याचा आरोप करीत शिवसेनेने पालिकेच्या प्रवेशद्वारावर बाप्पाची मूर्ती हातात घेऊन आंदोलन केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात विसर्जन घाट, महापालिकेने बांधलेले विसर्जन हौद बंद केले असून मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्ज झाल्यानंतर अनेक नागरिकांनी मूर्तीदान करण्यासाठी उपाययोजना नसल्याने विसर्जन घाट गाठला. मात्र, तेथे पोलिसांनी मज्जाव केल्याने गणपती विसर्जन करायचे कोठे? असा प्रश्न निर्माण झाल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी सांगितलं.

गणेशभक्तांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागल्याने शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केल्याचे सांगताना प्रभागनिहाय मूर्तीदान करण्यासाठी प्रतिनिधी निवडावा किंवा मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करावेत अशी मागणी यावेळी चिंचवडे यांनी केली.