महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिनेश धाडवे यांची नगरसेवकपद वाचविण्यासाठी जोरदार धडपड सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी अपात्र ठरवले जाईल या राष्ट्रवादीने घातलेल्या भीतीपोटी ‘योग्य ती काळजी’ घेत धाडवे यांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा निर्णय भाजपप्रवेशानंतर दुसऱ्याच दिवशी जाहीर केला.
भाजपवासी होऊन एक दिवस होत नाही तोच राष्ट्रवादीतच राहत असल्याचे पत्र धाडवे यांनी महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे बुधवारी दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेव दानवे यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ या निवासस्थानी जाऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या धाडवे यांचा पक्षप्रवेश सर्वश्रुत झाला असताना व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झालेली असताना आता नगरसेवकपद वाचवण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीला सोडता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेची आगामी निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. निवडणुकीला अवघे पाच महिने बाकी राहिल्यामुळे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यातच भारतीय जनता पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश लक्षात घेऊन भाजपमध्ये काही विद्यमान नगरसेवक जातील, असे सांगितले जात होते. अप्पर इंदिरानगर परिसरातून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दिनशे धाडवे आणि कर्वेनगर भागातून दुसऱ्यांना विजयी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक राजेश बराटे तसेच माजी नगरसेवक राजेंद्र गोरडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
या धक्कातंत्राचे पडसाद बुधवारी महापालिकेत उमटले. मात्र अवघ्या काही तासांतच धाडवे यांनी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे जाहीर केले. धाडवे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र भाजपकडून त्यांची फसवणूक करण्यात आली. तेथे गेल्यानंतर पक्ष प्रवेशाचा त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला धाडवे यांना पक्षातून अपात्र ठरविण्याची भीतीही घालण्यात आली. अपात्र ठरविल्यास त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, असा अप्रत्यक्ष इशाराही राष्ट्रवादीकडून देण्यात आला. त्यासाठी विभागीय आयुक्तांना पत्र देण्याच्या हालचालीही पक्षाच्या नेत्यांकडून सुरू झाल्या. हे लक्षात घेऊन नगरसेवकपद वाचविण्यासाठी त्यांनी अखेर संध्याकाळी महापौरांना पक्षातच राहत असल्याचे पत्र दिले.
दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे धाडवे यांनी महापौरांना पत्र दिले असले, तरी हे तांत्रिक कारण आहे. पुढील काही महिने ते राष्ट्रवादीत राहणार असले तरी मनाने ते भाजपचेच झाले आहेत. कायदेशीर प्रक्रिया टाळण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचलले, असे भारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील गटनेता गणेश बीडकर यांनी स्पष्ट केले.
पत्रात धाडवे म्हणतात..
नगरसेवक दिनेश धाडवे यांनी बुधवारी महापौर प्रशांत जगताप यांना पक्षातच राहत असल्याचे पत्र दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट ही सदिच्छा भेट होती. प्रभागातील कामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करण्यात आली. भेटीमागे अन्य कोणताही उद्देश नव्हता. मी आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.