गणेशोत्सवात उत्साह पाहिजे, सर्वानी उत्सवाचा आनंद घेतला पाहिजे; पण इतरांना त्याचा त्रास होता कामा नये. उत्साह असला, तरी सामंजस्य देखील ठेवले पाहिजे. तसे केले नाही, तर मंडळे आणि वाद्यांचीच चर्चा अधिक होते. त्यातून शहराची आणि मंडळांची बदनामी होते. म्हणून या सर्व गोष्टींची काळजी मंडळांनी घेतली पाहिजे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे पारितोषिक वितरण पवार यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. महापौर चंचला कोद्रे, पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, आमदार बापू पठारे, जयदेव गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, स्पर्धेचे संयोजक संदीप बालवडकर, नितीन जाधव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुण्याच्या उत्सवाची ख्याती राज्यातच नाही, तर जगात आहे. हा उत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे; पण उत्सवाचा आनंद घेताना इतरांना त्याचा त्रास होता कामा नये. त्या दृष्टीने या उत्सवाला कोठेही गालबोट लागणार नाही, उत्सवात महिलांची, ज्येष्ठांची काळजी घेतली जाईल, पोलिसांबरोबर सामंजस्य राहील, ध्वनिवर्धक अधिक वेळ वाजला म्हणून पोलिसांना खटले भरण्याची वेळ येणार नाही, सामाजिक, सांस्कृतिक एकता जपली जाईल, चांगला संदेश लोकांपर्यंत जाईल याची काळजी मंडळांनी घेतली पाहिजे, असे पवार यांनी या वेळी सांगितले.
कमानींची उंची किती हवी, जाहिराती कोणत्या करायच्या, मिरवणूक किती वेळ चालवायची, मिरवणुकीत बैल, हत्ती, घोडे असे प्राणी आणायचे का, आवाजावर किती र्निबध हवेत आदी अनेक विषयांवर आता कार्यकर्त्यांनीच विचार करावा, असेही आवाहन त्यांनी केले. दरवर्षी पोलीस आणि मंडळे यांच्यात काही ना काही संघर्ष पुण्यात होतो. त्यामुळे मंडळांची आणि वाद्यांचीच चर्चा अधिक होते. त्यातून मंडळांची आणि शहराचीही बदनामी होते. या सर्व गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांनी उत्सव योग्यप्रकारे साजरा करावा, असेही ते म्हणाले.
गणेश मंडळांचे काम आता उत्सवापुरतेच राहिलेले नाही, तर अनेकविध विषयांवर त्यांनी सातत्याने जनजागृती करण्याची गरज आहे. सामाजिक संदेश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवावेत, अशी अपेक्षा वंदना चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.