News Flash

सव्वाचारशे वर्षांपूर्वीची ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत प्रकाशात

या हस्तलिखितातील मंगलाचरण यामध्ये पाठभेद आहेत.

माउलींची सेवा करण्याच्या उद्देशातून होळकर संस्थानातील रामजी यांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ची सव्वाचारशे वर्षांपूर्वीची दुर्मीळ प्रत ही मराठी हस्तलिखित केंद्राकडे उपलब्ध झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीनंतर लिहिलेली ही पहिलीच हस्तलिखित प्रत असून मूळ ज्ञानेश्वरीतील मंगलाचरण आणि या हस्तलिखितातील मंगलाचरण यामध्ये पाठभेद आहेत.

पंढरपूर येथील प्रल्हाद महाराज बडवे यांचे होळकर संस्थानातील शिष्य रामजी यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची सेवा म्हणून ही ज्ञानेश्वरी लिहिली आहे. प्रल्हाद महाराज बडवे यांनी पांडुरंग माहात्म्य लिहिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ते उपस्थित होते आणि त्यांनी शिवाजी महाराजांना विठ्ठलाचा प्रसाद दिला होता, असे सांगितले जाते. त्या प्रल्हाद महाराज बडवे यांचे शिष्य असलेल्या रामजी यांनी शके १६१४ ते १६१६ म्हणजेच इसवी सन १६९२ ते १६९४ अशी दोन वर्षे अजानवृक्षाखाली बसून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. जो सध्या सर्वात जुन्या ग्रंथांपैकी एक मानला जातो. ही प्रत पंढरपूर येथील होळकर वाडय़ात वसंतराव बोरखेडकर-बडवे यांनी जतन केली आहे. रामजी यांचा कालखंड हा नाथकालीन आहे. संत एकनाथ महाराज यांच्या काळातच ही ज्ञानेश्वरीची प्रत लिहिली जाण्याचा योग साधला गेला आहे. ही दुर्मीळ प्रत तीन महिन्यांपूर्वी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील अमेरिकन इन्स्टिटय़ूटच्या मराठी हस्तलिखित केंद्रात उपलब्ध झाली असल्याची माहिती जुन्या हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली.

संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि रामजी यांचे ज्ञानेश्वरीचे हस्तलिखित यातील मंगलाचरणाच्या ओव्यांमध्ये पाठभेद आहेत. मूळ ज्ञानेश्वरीमध्ये ‘ॐ नमोजी आद्या’ असे आहे. तर, रामजी यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ‘ॐ नमोश्री आद्या’ असे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ‘जय जय स्वसंवेद्या’ असे असले, तरी रामजी यांच्या प्रतीमध्ये ‘जय स्वसंवेद्या’ असे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ‘तूचि गणेश’ आहे. रामजी यांच्या प्रतीमध्ये ‘तूचि गणेशु’ असे आहे. ‘सकळार्थ मति प्रकाशु’ हे रामजी यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ‘सकळार्थ प्रकाश’ असे आहे, असेही मंजूळ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 12:56 am

Web Title: dnyaneshwari copy release
Next Stories
1 ‘विल्सन्स डिसिज’वरील गोळ्यांचा तुटवडा संपवा’
2 दहावीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात चित्रपट, नाटय़, प्रसारमाध्यमांचाही समावेश
3 ‘फॅन्सी नंबर’ची हौस कायम
Just Now!
X