पुणे : सदोष किंवा जादा आकाराच्या चुकीच्या वीजबिलाची तक्रार मिळाल्यानंतर ती तातडीने सोडविणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ग्राहकाला चुकीचे वीजबिल दिले जाऊ नये, याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. चुकीचे किंवा अवाजवी रििडगचे सदोष वीजबिल मिळाल्यास धास्तावून न जाता ग्राहकांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणकडून मोबाइल अ?ॅपच्या माध्यमातून मीटर रीडिंग करण्यात येते. त्यामुळे वीजबिलाच्या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप अत्यंत कमी झालेला आहे. पूर्वीच्या तुलनेत मीटर रििडगची पद्धती अधिक सोयीस्कर आणि सोपी झालेली आहे. परंतु, रीडिंग घेणाऱ्या संस्थेचा हलगर्जीपणा किंवा तांत्रिक चुकांमुळे वीजग्राहकांना सरासरी, जादा युनिटचे सदोष बिल प्राप्त झाल्यास त्याबाबत संबंधित कार्यालयात त्वरित तक्रार करावी. अशा तक्रारींच्या निवारणासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. यापुढे सदोष मीटर रीडिंग चालू राहिल्यास संबंधित मीटर रीडिंग संस्थेविरुद्ध आर्थिक दंड, काळ्या यादीत टाकणे आदी कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अचूक रीडिंगद्वारे योग्य वीज वापराचे बिल देण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आहे. अचूक रीडिंगऐवजी सरासरी किंवा सदोष किंवा जादा रीडिंगचे बिल देण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
महावितरणकडून ग्राहकांना आवाहन
अत्यंत कमी वीजबिलाचीही माहिती द्या वीजमीटर सुस्थितीत असतानाही शून्य किंवा १ ते ५० युनिटपर्यंत वीजबिलांची आकारणी होत असल्याचे दिसून येत आहे. हा वीजवापर प्रत्यक्षात आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी महावितरणकडून वीजमीटरची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात वीजवापरापेक्षा अधिक वीजबिल येत असल्यास त्याचप्रमाणे अत्यंत कमी बिल येत असल्यासही ग्राहकांनी ही बाब महावितरणच्या लक्षात आणून द्यावी. वीजबिल दुरुस्तीसाठी त्वरित जवळच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.