|| विद्याधर कुलकर्णी

व्यावहारिक अडचणींमुळे यापुढे केवळ दिवाळी अंक :- मराठी साहित्यातील विविध प्रवाहांचा धांडोळा घेत आशयसंपन्न मजकूर देणाऱ्या ‘अक्षरधारा’ मासिकाने वर्षभरातच विश्राम घेतला आहे. पुरेशा सभासद संख्येचा अभाव आणि अंक चालविण्यासाठी येत असलेल्या व्यावहारिक अडचणींमुळे मासिक बंद करण्यात आले असले तरी, ‘अंतर्नाद’चा कित्ता गिरवत यापुढे ‘अक्षरधारा’ केवळ दिवाळी अंक स्वरूपातच वाचकांच्या भेटीस येणार आहे.

नियतकालिकांसाठी प्रतिकूल कालखंड असल्यामुळे ‘अंतर्नाद’ मासिक बंद पडले. मराठी नियतकालिकाच्या परंपरेला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशातून गेल्या वर्षी ‘अक्षरधारा’ मासिक सुरू करण्यात आले होते. अक्षरधारा बुक गॅलरीच्या सभासदांपैकी २५ टक्के सभासद मासिकाचे वर्गणीदार होतील अशी अपेक्षा होती. त्यादृष्टीने अंकाच्या निर्मितीचा दर्जा, गुणवत्ता आणि आशय यामध्ये तडजोड न करता उत्तम स्वरूपाचा अंक प्रकाशित करण्यामध्ये यश आले होते. मात्र, सध्याच्या धावपळीच्या काळात कोणाला वाचनासाठी सवड मिळत नाही, असे ध्यानात आले. व्यावहारिक अडचणींमुळे अक्षरधारा मासिक बंद करावे लागत आहे, असे अक्षरधारा बुक गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितले.

अक्षरधाराच्या डिसेंबरच्या अंकामध्ये स्नेहा अवसरीकर यांच्या संपादकीय लेखामधून या स्वरूपाची कल्पना वाचकांना देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

अक्षरधारा बुक गॅलरीचे नऊ हजार सभासद आहेत. मासिकाच्या पहिल्या वर्षी त्यापैकी किमान एक हजार सभासद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, वर्षभरानंतर ही संख्या त्याच्या २५ टक्के म्हणजे अडीचशेच्या जवळपास राहिली. एका अंकाच्या छपाईसाठी किमान दरमहा ७५ हजार रुपयांचा खर्च झाला. त्यातुलनेत अंकाच्या विक्रीतून येणारी रक्कम यामध्ये खूपच तफावत जाणवली. केवळ व्यावहारिक विचार करताना नुकसान सोसून अंक चालविण्यापेक्षा तूर्तास विश्राम घ्यावा, या उद्देशातून मासिक बंद करण्याचा निर्णय नाइलाजास्तव घ्यावा लागला, असे राठिवडेकर यांनी सांगितले.

अक्षरधारा दिवाळी अंकाच्या अडीच हजार प्रतींची यंदा विक्री झाली. मात्र, मासिकाला सभासदांचा प्रतिसाद नाही. त्यामुळे यापुढे दिवाळी अंक स्वरूपातच अक्षरधारा वाचकांच्या भेटीस येईल, असेही त्यांनी सांगितले.