|| चिन्मय पाटणकर

वर्षभरात राज्यातील ९० हजारहून अधिक विद्यार्थी इंग्रजी-हिंदी सोडून मातृभाषेत दाखल

इंग्रजी वा हिंदी माध्यमाचे शालेय विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून पुन्हा मराठी माध्यमाकडे वळत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांमध्ये राज्यभरातील ९० हजारहून अधिक विद्यार्थी मराठी माध्यमात दाखल  झाले आहेत. यात दुसरी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्तअसून, पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक, ७ हजार १४ विद्यार्थी मराठी माध्यमात आले आहेत.

विद्यार्थी-पालकांच्या प्रतिसादाअभावी मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत, मराठी माध्यमात विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत, इंग्रजी जागतिक भाषा असल्याने इंग्रजी हेच शिक्षणाचे माध्यम हवे अशी चर्चा सातत्याने केली जाते. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचा खर्च, विद्यार्थ्यांना विषयांचे आकलनच न होणे या कारणांमुळे अनेक विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमाकडे वळत असल्याचा मुद्दा ‘लोकसत्ता’ने गेल्या वर्षी ‘शिक्षण क्षेत्रात माध्यम बदलाचे नवे वारे’ या वृत्ताद्वारे चर्चेत आणला होता. हाच मुद्दा २०१८-१९ मधील आकडेवारीने पुन्हा अधोरेखित झाला आहे.

विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात येणे हा कल सकारात्मक आहे. मराठी माध्यमातील शिक्षणासाठी धडपणाऱ्यांच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. मात्र, आणखी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. मातृभाषा आणि परकीय भाषा या पेक्षा इंग्रजीतून शिकवलेले कळत नाही आणि मराठीतून शिकवलेले कळते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ‘इंग्रजी पोहोचते डोळ्यापर्यंत आणि मराठी पोहोचते मनापर्यंत’ हा अनुभव आलेल्या विद्यार्थी-पालकांमध्ये बदल होत आहे.     – अनिल गोरे, मराठी माध्यम चळवळीचे प्रसारक

आकडे काय सांगतात? : राज्य शासनाच्या विद्या प्राधिकरणाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी राज्यात दुसरी ते नववीतील ९० हजार १० विद्यार्थी मराठी माध्यमात परतले आहेत. राज्यात मराठी माध्यमात आलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये दुसरीतील १५ हजार ४६७, तिसरीतील १३ हजार ४३४, चौथीतील ९ हजार ९५१, पाचवीतील २८ हजार ३९६, सहावीतील ९ हजार ७९, सातवीतील ६ हजार ३२, आठवीत ५ हजार ३७७ आणि नववीतील २ हजार २७४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक विकास गरड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मराठी माध्यमात दाखल झालेल्या ९० हजारहून अधिक विद्यार्थ्यांपैकी ९९ टक्के विद्यार्थी इंग्रजी माध्यमांतील आहेत. इंग्रजी भाषा येणे आवश्यक असले, तरी आकलन चांगले होण्यासाठी शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. हा मुद्दा आता पालकांना पटू लागल्यामुळे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमाकडे वळत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. मराठी माध्यमाच्या शाळा आणि शिक्षक गुणवत्तेसाठी अथक परिश्रम करत असल्याचे हे फलित आहे.    – विकास गरड, विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक

जिल्हानिहाय आकडेवारी

  • पुणे – ७ हजार १४
  • मुंबई उपनगर- ६८२
  • मुंबई २ – ४४५
  • पालघर – ८८१
  • रायगड- १ हजार ८४
  • ठाणे – २ हजार ४८२
  • औरंगाबाद – ६ हजार ६२
  • नागपूर – ५ हजार ८८
  • अहमदनगर – ५ हजार ३२
  • नाशिक – ५ हजार ११
  • सोलापूर – ४ हजार १३२
  • लातूर- २ हजार ७२८
  • नांदेड – २ हजार ९०७
  • कोल्हापूर – ३ हजार ६६९
  • अमरावती – ३ हजार २१७
  • जळगाव- ३ हजार ४३९
  • सांगली- २ हजार २९८
  • सातारा- २ हजार २५
  • चंद्रपूर- २ हजार ५१२