उद्योनगरीचे सांस्कृतिक नगरीत रूपांतर करण्याचा निर्धार करत शहरातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमांपैकी सर्वात महत्त्वाच्या ‘स्वरसागर’ संगीत महोत्सवाचा सूर पहिल्याच दिवशी बिघडला. महापौर मोहिनी लांडे व पक्षनेत्या मंगला कदम यांच्यात मानापमान नाटय़ झाले. हक्काचा प्रेक्षकवर्ग असलेल्या प्राधिकरणात महोत्सव न घेतल्याने उपमहापौर राजू मिसाळ यांनी बहिष्कार घातला. या सर्व प्रकारात मुख्य संयोजकाचे ‘सँडविच’ झाले.
गेल्या १५ वर्षांपासून पिंपरीत ‘स्वरसागर’ महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्याचे स्थान ठरवण्यावरून गेल्या काही वर्षांपासून वादंग होतात, त्याचा प्रत्यय याही वर्षी आला. चिंचवडचे रामकृष्ण मोरे नाटय़गृह तसेच संभाजीनगर उद्यानात स्वरसागरचे कार्यक्रम ठरवण्यात आले, त्यावरून बरीच धुसफूस आहे. पक्षनेत्यांच्या आग्रहामुळे संभाजीनगरला कार्यक्रम घेण्यात येतो. प्राधिकरणात कार्यक्रम व्हावेत, असा उपमहापौरांचा आग्रह होता. त्यांनी मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांच्याकडे मागणी केली. मात्र, हा निर्णय महापौरांचा असल्याचे सांगत त्यांनी हात झटकले. याबाबतची बैठक व पत्रकार परिषदेची माहिती मिसाळांना नव्हती, थेट पत्रिकाच घरी आल्याने ते संतापले. तुपे एककल्ली कारभार करतात, राजकारण्याला लाजवेल, अशा खेळ्या करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, स्वरसागरच्या जाहिरात फलकांवर महापौरांचे फोटो नव्हते. मात्र, पक्षनेत्यांचे होते म्हणून महापौर नाराज होत्या. अशा मानापमानात मंगळवारी उशिरानेच उद्घाटन सोहळा सुरू झाला.
महापौरांच्या हस्ते उस्ताद शाहीद परवेज खान यांना स्वरसागर पुरस्कार प्रदान करण्यात आला. महोत्सवाविषयीच्या नाराजी नाटय़ाविषयी थेट भाष्य त्यांनी केले नाही. मात्र, महोत्सव कुठे घ्यावा, यावरून मतभिन्नता असली तरी तो आपल्याकडे व्हावा, असे प्रत्येकालाच वाटते. मात्र, प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन ठिकाण निवडले जाते.
मागील वेळेपेक्षा सुधारणा झाल्याने यंदा चांगला प्रतिसाद आहे, अशी टिपणी त्यांनी केली, अशी सूचक टिपणी त्यांनी केली.

सांस्कृतिक कार्यक्रमातही महापौरांचे ‘पवार पुराण’
पूर्णपणे सांस्कृतिक ‘टच’ असलेल्या स्वरसागर महोत्सवात महापौरांनी राजकीय थाटात भाषण केले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राबविलेले महिला धोरण व त्यामुळे महिलांचा झालेला फायदा तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्यामुळे झालेला शहराच्या विकासाचा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने मांडला. पवार साहेब आणि अजितदादांमुळेच शहराची स्वतंत्र ओळख असून जगाशा नकाशावर पिंपरी-चिंचवड गेले आहे. आम्ही महिला पदावर आहोत, ते त्यांच्यामुळेच, असे त्यांनी नमूद केले.