मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी उद्घाटन होण्याची शक्यता

पीएमपीच्या ताफ्यातील अपुऱ्या गाडय़ांच्या पाश्र्वभूमीवर पन्नास इलेक्ट्रिकल बस (ई-बस) पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मात्र त्या रस्त्यावर धावण्याऐवजी भेकराईनगर येतील डेपोमध्ये धूळ खात पडून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी या गाडय़ा रस्त्यांवर आणण्याची टाळाटाळ केली जात आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरणपूरक ठरणाऱ्या ई-बस घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्याअंतर्गत ५०० गाडय़ा भाडेकराराने घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० तर दुसऱ्या टप्प्यात ३५० गाडय़ांची खरेदी करण्यास पीएमपीच्या संचालक मंडळानेही मान्यता दिली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात नऊ मीटर लांबीच्या गाडय़ा पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्यानुसार १२ मीटर लांबीच्या पन्नास गाडय़ा भाडेकराराने घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊन पन्नास गाडय़ा पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मात्र स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी गाडय़ा मार्गावर आणण्यास टाळाटाळ केली जात आहे. प्रशासनाच्या आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या या निर्णयावर प्रवासी आणि स्वयंसेवी संस्थांनी टीका केली आहे.

सार्वजनिक वाहतूक ही प्रथम प्रवाशांच्या सोयीसाठी असते. हे लक्षात घेऊन पीएमपीने ताफ्यातील आरटीओ नोंदणी झालेल्या गाडय़ा रस्त्यावर आणणे आवश्यक आहे. मात्र त्या भेकराईनगर येथील आगारात ठेवण्यात आल्या आहेत. यापूर्वी पीएमपीच्या ताफ्यात नऊ मीटर लांबीच्या २५ गाडय़ा दाखल झाल्या तेव्हाही मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे त्याचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाल्यानंतर त्याचे उद्घाटन करण्यात आले. या परिस्थितीत एकदा उद्घाटन झाल्यानंतर पुन्हा उद्घाटनाचा घाट कशासाठी, असा प्रश्न पीएमपी प्रवासी मंचच्या सदस्या आशा शिंदे यांनी उपस्थित केला.

पीएमपीच्या ताफ्यात पन्नास गाडय़ा आल्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून पन्नास गाडय़ांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती पीएमपीचे मुख्य अभियंता सुनील बोरसे यांनी दिली.

ई-बस पीएमपीच्या ताफ्यात आल्या आहेत. त्या मार्गावर आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन, तीन दिवसांत उद्घाटनाचा कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गाडय़ांचे उद्घाटन होऊन त्या रस्त्यावर धावतील.    – सिद्धार्थ शिरोळे, संचालक, पीएमपी