पुणे शहर आणि ग्रामीण भागात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. हे पाहता करोनामुक्त झालेल्या प्रत्येकाने प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांनी केले.  पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ११ प्लाझ्मा दात्यांचा गौरव पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त मितेश घट्टे, सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम म्हणाले, करोना बाधित रुग्ण संख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने मागील पाच महिन्यांच्या कालावधीत अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या कोणत्याही बाधित रुग्णांस प्लाझ्माची आवश्‍यकता आहे. अशा करता पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने तयार केलेल्या http://puneplasma.in या वेबसाईटवर किंवा सहायक पोलीस निरीक्षक शिंत्रे यांच्या ९९६०५३०३२९ या मोबाइल क्रमांकावर व्हॉटस्अपद्वारे मेसेज करून प्लाझ्मा देऊ इच्छिणाऱ्यांनी नोंद करावी. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक रुग्णांचे जीव वाचवण्यास मदत होणार आहे. तसेच, आज प्लाझ्मा दान करणाऱ्यांनी जे काही करुन दाखविले याचा मला आनंद असून, पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करणे गरजेचे आहे. आपल्या सर्वांसोबत प्रशासन असून आपण आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन प्लाझ्मा दात्यांना त्यांनी यावेळी केले.