पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून पाच लाखांत घर अशी जाहिरात करून लोकांकडून पैसे गोळा करणाऱ्या मेपल कंपनीचे संचालक पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलिसांदेखत पळून गेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शिवाजीनगर येथील एका वृत्तवाहिनच्या कार्यालयाजवळ हा प्रकार घडला. मेपलचे संचालक सचिन अग्रवाल आणि गिरीश बापट वृत्तवाहिनीच्या कार्यालयात एका चर्चेत सहभागी होण्यासाठी आले होते. यादरम्यान, अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक करणे अपेक्षित होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर सचिन अग्रवाल कोणाच्या लक्षात येण्यापूर्वीच दुचाकीवर बसून पसार झाले. यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. याशिवाय, हा सगळा प्रकार सुरू असताना त्याठिकाणी गिरीश बापट उपस्थित असल्याने सरकारचा मेपलच्या संचालकांना आशीवार्द असल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मात्र, या चर्चेच्यावेळी मी आणि सचिन अग्रवाल वेगवेगळ्या खोलीत होतो. ते कार्यक्रमात सहभागी असल्याचे मला माहित नव्हते, असे गिरीश बापट यांनी सांगितले.
‘पाच लाखात घर’ या वादग्रस्त योजनेला राज्य शासनाने स्थगिती दिली असून या योजनेची चौकशी करून सविस्तर अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार या योजनेची नोंदणी थांबवण्याचे आदेश मंगळवारी संबंधितांना देण्यात आले. दरम्यान, मॅपल ग्रुपच्या संचालकांविरुद्ध मंगळवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी दुपारी मॅपल ग्रुपच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
प्रधानमंत्री आवास योजनेशी संबंध नसताना तशी योजना असल्याचे जाहीर करून मॅपल ग्रुपतर्फे पुण्यात घरांसाठी नोंदणी सुरू करण्यात आली होती. मात्र या योजनेबाबत तक्रारी झाल्यानंतर योजना थांबवण्याचे आदेश शासनाने सोमवारी दिले होते. तसेच या प्रकरणी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि दोषींविरुद्ध कायदेशीर व फौजदारी कारवाई करावी असे आदेश महाराष्ट्र प्रधानमंत्री आवास योजनेचे राज्याचे प्रकल्प संचालक निर्मलकुमार देशमुख यांनी दिले होते. या योजनेला स्थगिती देत योजनेची चौकशी करण्याचे आणि चौकशीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
दरम्यान, पाच लाखात घर देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी मॅपल ग्रुपच्या संचालकांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. सचिन अशोक अगरवाल, नवीन अशोक अगरवाल आणि विक्री विभागाच्या व्यवस्थापक प्रियांका अगरवाल, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक नारायण पालमपल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादंवि ४२०, ४१७, ३४, १२० (ब) आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅपल ग्रुपने जाहीर केलेल्या योजनेला कोणतीही मान्यता नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मॅपल ग्रुपचे मुख्य कार्यकारी आधिकारी सचिन अगरवाल यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. खटके पुढील तपास करत आहेत.
मनसेकडून कार्यालयाची तोडफोड
सर्वसामान्य जनतेला ‘आपल घर’ योजनेच्या नावाखाली स्वस्त घरांचे स्वप्न दाखवून फसवणूक होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने जमून शिवाजीनगर येथील मॅपल ग्रुपच्या कार्यालयाची दुपारी तीनच्या सुमारास मोडतोड केली.
मेपल ग्रुपने पाच लाखात घर देण्याचे गाजर दाखवून नागरिकांकडून १,१५० रूपये भरून घेऊन नोंदणी केली जात आहे. त्यातील दहा हजार नोंदणीधारकांना लॉटरी पद्धतीने पाच लाखात घर दिले जाणार आहे. प्रत्यक्षात हजारो लोकांनी या योजनेत नाव नोंदणी केल्याने कोटयवधी रुपये जमा झाले आहेत. नोंदणी केलेल्या सभासदांनी पसे परत मागितल्यास त्यांना भाडोत्री गुंडांकडून दमबाजी केली जात आहे. त्यामुळे मनसेच्यावतीने कार्यालयावर धडक मारून आंदोलन करण्यात आल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.

मॅपल ग्रुपने केलेल्या जाहिरातींबद्दल आक्षेप घेतले जात असतानाच या योजनेचे बांधकाम नकाशे सादर करताना किमान निकष पूर्ण केले गेले आहेत का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पीएमआरडीए आणि जिल्हा प्रशासन यापैकी एका प्रशासकीय यंत्रणेमार्फत संबंधितांनी बांधकाम नकाशे मंजूर करून घेणे आवश्यक होते. तसे ते करून घेतले आहेत का आणि शासनाच्या नियमानुसार म्हाडाकडून या संपूर्ण प्रकल्पाला मान्यता घेण्यात आली आहे का, असेही प्रश्न उपस्थित झाले असून या संबंधीची शहानिशा प्रशासकीय स्तरावर सुरू असल्याचे सांगण्यात आले.