स्वच्छ सर्वेक्षणात तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने समाजमाध्यमांतूनही टीका

महापालिका प्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षणात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत नागरिकांचा अभिप्राय (फिडबॅक) जाणून घेताना अनुकूल अभिप्राय कसा येईल, याची दक्षता घेण्यात येत आहे. स्वच्छतेसंदर्भात तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे किंवा कागदोपत्री निराकरण केले जात असल्यामुळे समाजमाध्यमातून प्रशासनाच्या या कारभारावर टीका सुरू झाली आहे. स्वच्छतेसंदर्भातील मूळ समस्यांकडे प्रशासनाकडून पाठ फिरविण्यात येत असल्याची वस्तुस्थिती  पुढे आली असून शहर कागदोपत्री अव्वल करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू झाल्याचेही स्पष्ट होत आहे.

शहरात स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महापालिकेकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पुणे दहाव्या स्थानी होते. त्यामुळे शहराला अव्वल करण्यासाठी यंदा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसहभाग हा स्वच्छ सर्वेक्षणाचा एक प्रमुख निकष आहे. महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत, तसेच स्वच्छतेबाबतचा अभिप्राय त्यासाठी जाणून घ्यावा लागणार आहे. संकेतस्थळाच्या तसेच नि:शुल्क दूरध्वनीच्या माध्यमातून नागरिकांना या सर्वेक्षणात सहभागी होता येणार आहे. शहर सर्वेक्षणात तुम्ही सहभाग नोंदविला आहे, याची कल्पना आहे का, स्वच्छतेबाबत समाधानी आहात का, व्यावसायिक किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा पेटय़ा दिसतात का, कचरा वर्गीकरण करण्याची सूचना कचरा वेचक देता का, संकलित कचरा कुठे जातो, स्वच्छतागृहे वापरण्याजोगे आहेत का, असे प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात येतात. मात्र त्यासाठी देण्यात आलेले बहुतांश प्रश्नांचे पर्याय सकारात्मकच आहेत. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक उत्तरे द्यावीत, असे नागरिकांना सांगण्यात येत आहे.

शहराच्या बहुतांश भागात कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसतो. उड्डाणपुलाखाली, प्रमुख रस्ते-चौकात अस्वच्छता मोठय़ा प्रमाणावर आहे. मात्र सर्वेक्षणातील प्रतिसादावर किंवा नागरिकांच्या अभिप्रायावरच महापालिका प्रशासन अव्वल ठरणार आहे. यापूर्वीही स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती महापालिका प्रशासनाकडून नागरिकांवर करण्यात आली होती. किमान तीन लाख नागरिकांकडून अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनाही अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच दररोज किमान एक तक्रार अधिकाऱ्यांनी अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदवावी, अशी सक्ती अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. आता सकारात्मक अभिप्राय देण्याच्या नियमावलीमुळे स्वच्छ सर्वेक्षणातील अभिप्रायासाठीचे प्रयत्न दिसून येत आहेत.

कागदोपत्री निराकरण

शहर स्वच्छतेबाबत समाधानी आहात का, अशी विचारणा महापालिकेने ट्विटरवर केली होती. त्यावर नागरिकांनी प्रभागातील समस्या सांगितल्या होत्या. मात्र त्याबाबत कोणतीही ठोस कृती प्रशानसाकडून करण्यात आली नाही. काही ठिकाणी कागदोपत्री निराकरण झाल्याचे दाखविण्यात आले. तक्रार करूनही कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांनी हतबलता व्यक्त केली होती.