19 January 2021

News Flash

‘मनोरंजन’चे संस्थापक, रंगकर्मी  मनोहर कुलकर्णी यांचे निधन

हौशी कलाकार, निर्माता आणि नाटकांचे जाणकार

हौशी कलाकार, निर्माता आणि नाटकांचे जाणकार

पुणे : ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटय़व्यवस्थापन क्षेत्रात सहा दशकांपासून कार्यरत असलेल्या ‘मनोरंजन’ या संस्थेचे संस्थापक मनोहर चिंतामण कुलकर्णी (वय ९२) यांचे वृद्धापकाळामुळे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलगे, कन्या, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ‘मनोरंजन’चे संचालक मोहन कुलकर्णी हे त्यांचे पुत्र होत.

हौशी कलाकार, निर्माता आणि नाटकांचे जाणकार असे कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू असले तरी, नाटय़संस्थांच्या विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणारे व्यवस्थापक अशी त्यांची ख्याती होती. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’ ‘भावबंधन’, ‘मुन्सिपाल्टी’, ‘घराबाहेर’, ‘उद्याचा संसार’, ‘संशयकल्लोळ’, ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ अशा मोजक्या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. १९५० पासून  ते सरस्वती मंदिर संस्थेमध्ये काम करत होते. टपाल विभागामध्ये नोकरीला असताना त्यांनी विभागातील नाटय़स्पर्धामध्ये सहभाग घेतला. १९६१ मध्ये ‘बहुरूपी रंगमंदिर’ या पुण्यातील खुल्या नाटय़गृहाचे व्यवस्थापन पाहताना त्यांनी चित्तरंजन कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, चारुदत्त सरपोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली नाना रायरीकर यांच्यासमवेत १९६७ पर्यंत नू. म. वि. प्रशाला आणि पेरुगेट भावे स्कूल येथे वार्षिक वासंतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. १९६८ पासून शहरातील विविध नाटय़गृहांमध्ये नाटय़प्रयोग, संगीत नाटक आणि ऑर्के स्ट्रा अशा कार्यक्रमांचे संयोजन केले. डिसेंबर १९७० मध्ये त्यांनी नाना रायरीकर आणि मु. रा. ऊर्फ डॅडी लोणकर यांच्यासमवेत ‘मनोरंजन’ या संस्थेची स्थापना केली. मराठीसह, कानडी, बंगाली, हिंदूी, गुजराती भाषेतील नाटकांच्या प्रयोगांच्या व्यवस्थापनाचे काम त्यांनी पाहिले.

व्यावहारिक हिशोब न पाहता ‘सूर्य पाहिलेला माणूस’ आणि ‘उजळल्या दिशा’ या नाटकांना रंगमंचावर सादर करण्याचे काम कुलकर्णी यांनी निर्मात्याच्या भूमिकेतून केले. नाटय़व्यवस्थापन क्षेत्रातील भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या कुलकर्णी यांना आदराने ‘अण्णा’ संबोधिले जात होते. नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष म्हणून काम करताना नाटय़निर्मात्यांकडून प्रयोगामागे पाच रुपये घेऊन ५० हजार रुपयांची देणगी संकलित करीत त्यांनी नाटय़ परिषदेला आर्थिकदृष्टय़ा सक्षम केले. कुलकर्णी यांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्कारासह पुणे महापालिकेच्या बालगंधर्व पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 3:53 am

Web Title: founder of manoranjan company manohar chintaman kulkarni passed away zws 70
Next Stories
1 मोकळ्या जागांमध्ये पर्यायी व्यवस्था
2 ८३ टक्के ग्राहकांकडून बीएसएनएलच्या देयकांचा ऑनलाइन भरणा
3 टाळेबंदीत भररस्त्यात सराईताकडून वाढदिवस
Just Now!
X