वाहतूक सुविधांसाठी आठ कोटींपैकी जेमतेम ५० लाखांचा खर्च

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका आणि पोलीस यांचे एकत्रित प्रयत्न सुरु असतानाच वाहतुकीच्या पायाभूत सुविधांसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेला निधी खर्च होत नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पायाभूत सुविधांसाठी अंदाजपत्रकामध्ये असलेल्या आठ कोटी रुपयांपैकी जेमतेम पन्नास लाखांपर्यंतचा खर्च महापालिकेच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आला आहे. एका बाजूला निधी खर्च होत नसताना अंदाजपत्रकातील मोठय़ा वाहतूक प्रकल्पांसाठीचा राखीव निधी प्रभागांमधील कामांसाठी वळविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकातील वाहतूक सक्षमीकरणाचा दावा फोल ठरला आहे.

महापालिकेच्या सन २०१८-१९ या वर्षांतील अंदाजपत्रकामध्ये शहरातील वाहतूक सुरक्षित आणि जलद गतीने होण्यासाठी वाहनतळ, पादचारी मार्ग, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल बांधण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. विनासायास, जलदपणे प्रवास करता यावा यासाठी काही प्रकल्पांचीही घोषणा अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली होती. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये २२५ कोटी रुपयांची तरतूदही प्रस्तावित करण्यात आली. याशिवाय आठ कोटी २८ लाख रुपयांचा निधी पायाभूत सुविधांच्या विकसनासाठी प्रस्तावित करण्यात आला होता. या आठ कोटी रुपयांच्या निधीतून वाहतूक नियंत्रण दिव्यांची उभारणी (सिग्नल), दुभाजकांची दुरुस्ती, वाहतुकीला अडथळा ठरणारी बेटे (आयलॅण्ड) हटविणे, सूचनाफलक बसविणे अशा कामांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र या निधीपैकी पन्नास लाख रुपयेच गेल्या सात महिन्यात खर्च झाले आहेत.

शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रमुख रस्ते, चौक, उपरस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यावरून टीका सुरु झाल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव आणि पोलीस आयुक्तांनी पुढाकार घेत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पाऊले उचलली होती. महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही झाल्या होत्या. प्रमुख चौकातील अतिक्रमणे हटविणे, दिशादर्शक फलकांची उभारणी, सिग्नलचे सुसूत्रीकरण अशा काही उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. मात्र या कामांसाठी प्रस्तावित असलेला निधी खर्च होत नसल्यामुळे बैठकांमध्ये ठरलेल्या उपाययोजना होणार का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाहतूक नियोजन विभागाची उदासीनता असतानाच अंदाजपत्रकातील उड्डाणपूल, जलदगती बस मार्गाचा (बीआरटी) निधी प्रभागात विकासकामे करण्यासाठी वळविण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता. त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र चालू आर्थिक वर्षांत हे काम होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर हा निधी प्रभागातील अन्य कामांसाठी वळविण्यात आला. त्यानंतर सोलापूर रस्त्यावरील प्रस्तावित बीआरटी मार्गासाठीच्या ७० कोटींच्या निधीचेही प्रभागातील कामांसाठी याच पद्धतीने वर्गीकरण करण्यात आले. त्यामुळे एकूणच वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात अधिकारी आणि नगरसेवक किती असंवेदनशील आहेत, हेच स्पष्ट झाले आहे.

अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प

वाहतूक सुरळीत होण्यासाठी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर), तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगदा, बालभारती—पौड फाटा रस्ता आणि सिंहगड रस्ता परिसरात उड्डाणपूल या महत्त्वाकांक्षी कामांचा समावेश आहे. सिंहगड रस्ता आणि सहकारनगर, पद्मावती, पर्वती हा भाग एकमेकांना जोडण्यासाठी  तळजाई टेकडीपासून सिंहगड रस्त्याला जोडणारा बोगदा विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त करून प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एचसीएमटीआरच्या प्रक्रियेला गती मिळालेली नाही. तळजाई टेकडी ते सिंहगड रस्ता बोगद्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद आहे. हे काम यंदा होण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यासाठी असलेला निधीही वळविण्यात येण्याची शक्यता आहे.