News Flash

छोटय़ा कचरापेटय़ा बसवल्या; पण नियोजन शून्य

नागरिकांना पालिकेच्या नियोजनशून्यतेचा दुहेरी नमुना बघायला मिळाला.

स्वच्छ शहरासाठी पुणे महापालिकेच्या प्रयत्नांना फटका

शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेला निधी प्राप्त होतो आणि त्यातून शहरात छोटय़ा कचरापेटय़ा बसवल्या जातात.. वरवर पाहता यात उणे काढण्यासारखे काहीच नाही. पण त्या कचरापेटय़ा सुविधा ठरण्याऐवजी नागरिकांसाठी अडथळा ठरत असतील तर?.. जंगली महाराज रस्ता आणि फग्र्युसन रस्त्यावर बसवण्यात आलेल्या या पेटय़ा जशा अचानक बसल्या तशाच त्या कचरापेटय़ा एका रात्रीत महापालिकेकडूनच अचानक उखडल्या गेल्या. त्यामुळे नागरिकांना पालिकेच्या नियोजनशून्यतेचा दुहेरी नमुना बघायला मिळाला.

‘स्वच्छ आणि हरित शहरा’साठी (क्लीन अँड ग्रीन सिटी इनिशिएटिव्ह) ‘सिरम इन्स्टिटय़ूट’ आणि पूनावाला समूहाने महापालिकेला शहरातील मूलभूत विकास कामांसाठी शंभर कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देऊ केले होते. ‘अदर पूनावाला क्लीन सिटी मूव्हमेंट’ आणि महापालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या या संयुक्त प्रकल्पाचा जानेवारी २०१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचा एक भाग म्हणून महापालिकेने अक्षरश: एका रात्रीत जंगली महाराज रस्ता आणि फग्र्युसन रस्त्यावरील पदपथांवर ‘ऑलिव्ह ग्रीन’ रंगाच्या छोटय़ा कचरापेटय़ा उभारल्या. पण दर वीस पावलांवर दर्शन देणाऱ्या या कचरापेटय़ा नागरिकांसाठी सुविधा न होता अडथळाच ठरल्या.

सर्वप्रथम लक्ष वेधले ते या कचरापेटय़ांच्या मोठय़ा संख्येने. रस्त्यावर कचरा टाकण्यासाठी कोणतीही सोय असू शकते याची सवयच नसणाऱ्या पुणेकरांना या अगदी थोडय़ा-थोडय़ा अंतरावर उभारलेल्या कचरापेटय़ा नवीन होत्या. मुळात एवढय़ा संख्येने कचरापेटय़ांची आवश्यकता आहे का आणि तेवढय़ा प्रमाणात त्यात कचरा टाकला जाईल का, अशी शंका त्यावेळीच नागरिक व्यक्त करत होते. एकुणातच या कचरापेटय़ा अशा पद्धतीने उभारण्यात काहीही नियोजन नसल्याचेच दिसून येत होते.

दुसरी लक्षवेधी गोष्ट ठरली तो कचरापेटय़ांचा रंग. एका कचरापेटीत ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी दोन डबे होते खरे, पण ते दोन्ही ‘ऑलिव्ह ग्रीन’ रंगाचेच होते. कोणत्या प्रकारचा कचरा कोणत्या डब्यात टाकावा हे स्पष्ट दिसेल अशी काही योजनाच नव्हती. अनेक ठिकाणी या कचरापेटय़ा पदपथ वा रस्त्यांच्या वळणावर पायी चालणाऱ्यांना अडथळा होतील अशा पद्धतीने बसवलेल्या होत्या. या कचरापेटय़ा अपारदर्शक आणि गडद रंगाच्या असल्यामुळे त्यात कचऱ्याव्यतिरिक्त आणखी काही टाकले गेले असते तरी दिसणार नाही, अशी परिस्थिती होती. २०१२ मध्ये जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बाँबस्फोटांनंतर अशी प्रकारे अशा प्रकारचा धोका पत्करावा का, अशी चर्चाही पुणेकरांमध्ये होत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 3:39 am

Web Title: garbages box issue in pune
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : वैविध्यपूर्ण वाचन हा शाहिरीचा प्राण
2 पुणे मेट्रोच्या भूमिपूजनावरून राजकीय डावपेच
3 स.प. महाविद्यालयाची ‘३०० मिसिंग’ महाअंतिम फेरीत
Just Now!
X