News Flash

गुढीपाडवा खरेदीवर करोनाचे सावट

मिठाई विक्रेत्यांना ५० टक्के ग्राहकांची पसंती

गुढीपाडव्यानिमित्त ठाण्याच्या बाजारपेठेत मंगळवारी गर्दी होती. (छाया-दीपक जोशी)

सराफा व्यावसायिकांची दीडशे कोटींची उलाढाल ठप्प; मिठाई विक्रेत्यांना ५० टक्के ग्राहकांची पसंती

पुणे : गुढीपाडव्याच्या खरेदीवर करोना संकटाचे सावट स्पष्टपणे जाणवले. जीवनावश्यक वस्तू वगळता शहरातील सर्व दुकाने बंद असल्याने अनेकांना मुहूर्ताचे सोने खरेदी करता आले नाही. त्यामुळे सराफ व्यावसायिकांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. कडक निर्बंध आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करण्याचे टाळण्याच्या उद्देशातून ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मिठाई व्यावसायिकांचा जेमतेम ५० टक्के व्यवसाय झाले.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यामध्ये दरवर्षी किमान दीडशे कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, करोना प्रादुर्भाव टाळण्याच्या उद्देशातून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे ही उलाढाल थांबली असल्याचे पुणे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले. अनेक जण पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने, चोख सोने, वेढणी, नाणी (गोल्ड कॉइन्स) खरेदी करतात. तर काही घरांमध्ये लग्नसराईसाठी म्हणून सोने खरेदी केले जाते. पाडव्याच्या आठ दिवस आधीपासून ग्राहकांच्या ऑर्डरनुसार दागिने तयार केले जातात. मात्र, यंदा अंशत: टाळेबंदीमुळे नागरिकांना सोनेखरेदीला मुरड घालावी लागली, असे त्यांनी सांगितले.

चक्का आणि श्रीखंड म्हणजे गुढीपाडवा असे पुणेकरांचे समीकरण झाले आहे. करोनाची भीती आणि सुरक्षित अंतराच्या निकषांचे पालन करण्यासाठी ग्राहकांनी सुरक्षित अंतर ठेवले. त्यामुळे चक्का आणि श्रीखंडाच्या खपावर ५० टक्के परिणाम झाला.  गुढीपाडव्याला उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने पेढे, बर्फी अशा मिठाई खरेदीमध्ये ७५ टक्के घट झाली आहे, असे ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले.

जळगावमध्ये व्यावसायिकांचा हिरमोड

नाशिक : जळगावच्या सुवर्ण नगरीत करोनाच्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्या वर्षी गुढी पाडव्याचा मुहूर्त साधता न आल्याने व्यावसायिकांसह ग्राहकांचा हिरमोड झाला. उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद राहिली. करोनाच्या सावटात नवीन घर, वाहन, सोने खरेदीचा विषय बाजूला पडला. सलग दुसऱ्या वर्षी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची छाया उत्तर महाराष्ट्रात अधोरेखित झाली. बाजारपेठेत नेहमीसारखी गर्दी नव्हती. उन्हामुळे फुले कमी, पण मागणी जास्त अशी स्थिती असल्याने फूल बाजार तेजीत होता. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जळगावच्या बाजारपेठेत शुकशुकाट होता. दोन वर्षांपूर्वी शहरातील बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या दिवशी १० कोटींहून अधिकची उलाढाल झाली होती. गत वर्षी आणि यावेळी निर्बंधांमुळे ही संपूर्ण उलाढाल ठप्प झाल्याचे जळगाव सराफ व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी सांगितले. नाशिकच्या सराफ बाजारात कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली. विशिष्ट मुहूर्तावर स्थावर मालमत्तांचे दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवली जातात. परंतु करोनामुळे या दिवशी ही कार्यालये बंद होती. वाहन क्षेत्रातील व्यवहारही थंडावले. धुळ्यातील बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंसह अन्य दुकाने उघडण्यात आल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

रायगडमध्ये खरेदीसाठी झुंबड

अलिबाग:  गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्य़ात खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या होत्या. यानिमित्ताने अंतर नियमांचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.  सोमवारी आणि मंगळवारी बाजारपेठा गजबजल्या होत्या.

मराठवाडय़ात सोने खरेदी ऑनलाइन

औरंगाबाद : करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी औरंगाबादसह मराठवाडय़ाच्या बाजारपेठेत  शुकशुकाट दिसून आला. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाव्यतिरिक्त वाहन, सराफ बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. मात्र ऑनलाइन सोने खरेदीचे सराफ बाजारात व्यवहार झाले आहेत.

सराफ असोसिएशनचे राज्य सहसचिव मंगेश लोळगे यांनी ऑनलाइन व्यवहार झाल्याचे सांगितले. सोने खरेदीचा मुहूर्त अनेकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी साधला. विश्वासातील सराफ व्यावसायिकांकडून विकसित करण्यात आलेल्या उपयोजनवर नव्या धाटणीचे दागिने ऑनलाइन खरेदी केले. दागिना, त्याचे वजन, प्रकार आणि किंमत, अशा रचनेचे उपयोजन तयार केले आहे. त्यावरून साधारण १० ते २५ टक्के अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीने घेऊन ही खरेदी-विक्री झाली. सोन्याचा दर  ४८ हजारांवर होता. करोनामुळे, पाडव्याचा कोटय़वधींचा व्यवहार ठप्प झाल्याचेही लोळगे यांनी सांगितले.  वाहन बाजारपेठेत मात्र, अक्षरश: शुकशुकाट होता. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही वाहनांची नोंदणी होत असते. यंदा मात्र, वाहनांची दुकानेच बंद असल्याने एकही नोंदणी झाली नसल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार यांनी सांगितले.

नागपुरात सराफा पेढय़ांना शंभर कोटींचा फटका

नागपूर : शहरात पाडव्याच्या सोने खरेदीचा उत्साह गगनाला भिडलेला असतो. सराफा बाजारातील प्रत्येक दुकानात ग्राहकांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे पाडव्याच्या एका दिवसात शंभर कोटींचा व्यवसाय होतो. मात्र यंदा टाळेबंदीमुळे बाजारपेठा बंद असल्याने सराफा व्यापाऱ्यांना शंभर कोटींचा फटका बसला. काही सराफा व्यापाऱ्यांनी ग्राहकांसाठी ऑनलाइन दागिने विक्रीचा पर्याय उपलब्ध केला होता, मात्र त्यालाही प्रतिसाद नव्हता.

नागपुरातील सराफा बाजारात केवळ शहरातूनच नाही तर सर्वदूर विदर्भासह, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथून देखील ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी येत असतात. एक हजाराहून अधिक सराफा व्यापारी येथे आहेत.

त्गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पाडवा टाळेबंदीत गेला. व्यापाऱ्यांनी ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध करून दिला. त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही.

त्याशिवाय नागपुरात करोना रुग्णांची संख्याही मोठी असल्याने नागरिक देखील घराबाहेर पडत नसून त्यांनी देखील जीवनावश्यक वस्तू सोडता इतर खरेदीला प्राधान्य देणे कमी केले आहे. सराफा व्यापारी राजेश रोकडे सांगतात दागिने ‘टच अ‍ॅण्ड फिल’ प्रकारात मोडतात. नागपूरकरांना दालनात जाऊन दागिना प्रत्यक्ष पाहून किंवा घालून खरेदी करण्यास अधिक पसंती आहे. मात्र यंदा टाळेबंदीमुळे ते शक्य झाले नाही, तर आम्ही ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून दिला असला तरी लोकांचा त्याला विशेष प्रतिसाद लाभला नाही. असे असले तरी आमच्या काही ग्राहकांनी पाडव्याचा शुभमुहूर्त जाऊ दिला नाही. त्यांनी या मुहूर्तावर दागिन्यांची पूर्व नोंदणी केली मात्र दागिना ते टाळेबंदीनंतर घेऊन जाणार आहेत, असेही रोकडे यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रात गर्दी आणि धास्तीही!

पुणे:  गुढीपाडवा सणासाठीची खरेदी आणि संभाव्य टाळेबंदीसाठी आवश्यक गोष्टींची साठवण या दोन्हीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापुरातील बाजारपेठांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी गर्दी झालेली दिसून आली. शनिवार, रविवारच्या बंदनंतर सोमवारी दुकाने उघडल्यापासून बाजारात गर्दी होत आहे.   बाजारात होणारी ही गर्दी प्रामुख्याने किराणा, धान्य, औषध, भाजीपाला, फळे, सणासाठी आवश्यक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये दिसून येत होती. दुसरीकडे पाडव्याच्या निमित्ताने सराफ, कापड, घरगुती विद्युत उपकरणे, वाहन विक्रीच्या दुकानांमध्ये मोठी उलाढाल होते. मात्र करोनामुळे या दुकानांवर सध्या निर्बंध लादले आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी आज ही दुकाने उघडली होती. मात्र इथे व्यवहार पाडव्याच्या तुलनेत कमी होताना दिसत होते. ऐन लग्नसराई आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला करोनाचे विघ्न आल्याने सांगलीतील सराफी पेठ बंद ठेवावी लागली होती. यामुळे १० कोटींची उलाढाल बुडाल्याचे सराफ समितीचे अध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर यांनी सांगितले. वाहन विक्रीची दालने आज सुरू असली तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ७० टक्क्य़ांनी घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सातारा, कोल्हापूरसह सोलापुरातील बाजारपेठांमध्येही गर्दी दिसली तरी, ती अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी प्रामुख्याने होती. दरम्यान या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनाही अनेक ठिकाणी हस्तक्षेप करावा लागत होता.  सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुरात गेल्या काही दिवसांत करोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस होत असलेल्या या गर्दीने पश्चिम महाराष्ट्रातील हे चारही जिल्हे धास्तावले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 1:13 am

Web Title: gold trader turnover of rs 150 crore stalled on gudi padva festival due to covid 19 cases zws 70
Next Stories
1 मुखपट्टीचा नियम पायदळी; पावणेतीन लाख नागरिकांवर कारवाई
2 नदीकाठ विकसनाला मुहूर्त
3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मीळ लघुपट
Just Now!
X