पोलिसांनी नागरिकांकडून सल्ला मागवला;
पाच ठिकाणी पत्रसूचना पेटी बसवणार
पुण्यातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत आहे. या पाश्र्वभूमीवर वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुणेकरांनी सूचना पाठवाव्यात, सल्ला द्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे. नागरिकांना सूचना करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयासह पोलिसांच्या परिमंडळ कार्यालयांमध्ये सूचना पेटय़ाही बसविण्यात येणार आहेत.
पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी पुण्यातील वाहतुकीची समस्या जाणून घेतली. वाहतुकीची समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी त्यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. तसेच, गणेशखिंड रस्ता, विद्यापीठ चौक, शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, शाहीर अमरशेख चौक ते मंगळवार पेठेतील मालधक्का चौक येथील वाहतूक कोंडीचा अनुभव शुक्ला यांनी घेतला. त्यांनी विविध रस्त्यांवरील वाहतुकीच्या समस्या प्रत्यक्षही पाहिल्या. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी वाहतूक पोलिसांना रस्त्यावर थांबण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. विविध ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आल्यामुळे या रस्त्यांवरची वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. तसेच, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
पुण्यातील मध्यवस्तीतील रस्त्यांसह उपनगरातील प्रमुख रस्त्यांवर दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून मार्ग काढणाऱ्या वाहनचालकांची दमछाक होते, तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत आणखीन भर पडते. रस्त्याच्या दुतर्फा सम-विषम दिनांक विचारात घेऊन वाहने लावली जात नाहीत. शहराच्या वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त शुक्ला यांनी पुणेकरांच्या सूचना विचारात घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी वाहतुकीसंबंधीच्या सूचना, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना लेखी स्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन शुक्ला यांनी केले आहे.त्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयासह परिमंडळ एक (फरासखाना इमारत), परिमंडळ दोन (लष्कर पोलीस ठाणे), परिमंडळ तीन (एम्पायर इस्टेट, चिंचवड), परिमंडळ चार (येरवडा क्षेत्रीय कार्यालय इमारत) येथे सूचना पेटी बसविण्यात येणार आहे.

स्वयंशिस्तही तितकीच महत्त्वाची
पुणे शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या समस्यादेखील वाढत आहेत. वाहने रस्त्यावर दुतर्फा लावली जातात. पोलिसांनी कारवाई केल्यास स्थानिक रहिवासी तक्रारी करतात. सूचना पेटी बसविल्यास त्याचा फायदा होईल. परंतु अनेक सूचनांवर अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही. वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ आणि शहराचा विस्तार पाहता प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करणे शक्य होईल असे नाही. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहनचालक देखील अनास्था दाखवतात. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे देखील गरजेचे आहे, अशी अपेक्षा वाहतूक शाखेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

वाहतूक कोंडी होणारे प्रमुख रस्ते
विद्यापीठ चौक, फग्र्युसन रस्ता, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, जेधे चौक (स्वारगेट), नेहरु रस्ता, हिंजवडी, खराडी बाह्य़वळण रस्ता, रामवाडी ते वाघोली (पुणे- नगर रस्ता), मुंढवा यासह मध्यवस्तीतील अनेक रस्त्यांवर वाहतुकीची समस्या आहेत. तेथील कोंडी सोडविण्यासाठी अनेकविध उपाययोजना करणे गरजेचे आहे.