जन्मापासून ते मृत्यूपर्यंत १३३ धार्मिक विधी; पौरोहित्य करणाऱ्या २११ गुरुजींची एकत्रित सूची

घरात कोणतेही धार्मिक कार्य करावयाचे असेल आणि त्यासाठी पौरोहित्य कोणी करायचे या कठीण प्रश्नाचे उत्तर देणारे ‘गुरुजी ऑन डिमांड’ म्हणजेच ‘गॉड’ हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असे १३३ धार्मिक विधी आणि यजमानांच्या इच्छेनुसार पौरोहित्य करणाऱ्या २११ गुरुजींची एकत्रित सूची मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळामुळे पूजेचा मुहूर्त टळणे, वेळेवर गरजेची पूजा सामग्री उपलब्ध नसणे या समस्या दूर होण्याबरोबरच एका क्लिकच्या मदतीने गुरुजी उपलब्ध होणे आता शक्य झाले आहे. तसेच पूजेसाठी असलेली गुरुजींची दक्षिणा सर्वत्र एकसारखीच असणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसर मिळून ५० किलोमीटर क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संकेतस्थळासह मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर दररोज दोनशे ते अडीचशे लोकांकडून चौकशी होत आहे. पूजा आणि सामग्री तसेच कोणाला केवळ सामग्री हवी असेल तर नावनोंदणी केल्यानंतर त्या यजमानांना किंवा गुरुजींना घरपोच सेवा दिली जाते. गुरुजी ऑन डिमांड संकेतस्थळाच्या मदतीने पूजेसाठी नावनोंदणी करण्यापासून ते पूजा होण्यापर्यंतच्या सर्व समस्या सोडविल्या जातील. पुढच्या टप्प्यात मंगल कार्यालयांशी समन्वय साधण्यात येणार असून भविष्यात राज्यभरात याचा विस्तार करण्याचा मानस आहे. व्हीएमओएसए टेक्नॉलॉजीजने हे संकेतस्थळ विकसित केले असल्याची माहिती प्रणव चावरे यांनी दिली. संस्थेचे अक्षय चावरे, अभिषेक कुलकर्णी आणि अजित चावरे या वेळी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते नुकतेच संकेतस्थळाचे उद्घाटन झाले.

असे चालते संकेतस्थळाचे काम

* ‘गुरुजी ऑन डिमांड’ वर यजमानांनी पूजेची नोंद करून झाल्यावर गुरुजींचा एक युनिक आयडी नंबर आणि नाव हे एसएमएसद्वारे यजमानांना देण्यात येते. पूजेच्या गुरुजींना आणि यजमानांना एकमेकांचे नंबर दिले जातात.

* हे संकेतस्थळ गुरुजींना दक्षिणा देण्यासाठी ऑनलाइन तसेच कॅश ऑन सर्व्हिस अशा सुविधा देते. किंवा कॅश ऑन सर्व्हिस म्हणजेच पूजेची नोंदणी करताना १५ टक्के आणि उर्वरित ८५ टक्के रक्कम ही थेट गुरुजींच्या हाती सोपवता येते. ही प्रक्रिया कायद्यांतर्गत असल्याने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होतो. त्याचा फायदा यजमान, गुरुजी आणि देशाला होतो.

* ‘गुरुजी ऑन डिमांड’ हे बहुउद्देशीय अॅप असून फक्त पूजेसाठी नाही तर मुहूर्त आणि पूजेची माहिती पाहण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.