‘माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या अपघातात बाधित झालेल्या एकूण ४० कुटुंबांपैकी ३७ कुटुंबांचे प्रथम श्रेणीचे वारस शासनाला सापडले आहेत; तर उरलेल्या तीन कुटुंबांचे द्वितीय श्रेणीचे वारस शोधून काढण्यात आले आहेत. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावे त्यांच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५ लाख रुपये तर केंद्र शासनातर्फे २ लाख रुपयांची मदत मिळणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ज्या नागरिकांचा दुर्घटनेत जीव वाचला आहे पण संपत्तीचे मात्र नुकसान झाले आहे, त्यांचेही शंभर टक्के पुनर्वसन होणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. दुर्घटनेविषयीचा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारला गुरुवारी सायंकाळी पाठवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘दुर्घटनेनंतर केलेल्या मदतकार्यात १४६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर ५ मृतदेह अवयव स्वरूपात सापडले. ३८ नागरिक अपघातातून बचावले असून त्यातील ९ जण जखमी आहेत. माळीण गावात असलेल्या सात वाडय़ा अद्याप सुरक्षित आहेत. या वाडय़ांमध्ये राहणे कितपत सुरक्षित आहे यासंबंधी ‘भारतीय भूशास्त्र सर्वेक्षण विभागा’तर्फे (जीएसआय) सर्वेक्षण सुरू आहे. जीएसआयने शिफारस केल्यास या वाडय़ांचेही कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल. बचावलेले गावकरी गाव सोडण्यास तयार नसून तात्पुरते व कायमस्वरूपी पुनर्वसनही त्याच भागात व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र जीएसआयने सुरक्षित ठरवलेल्या भागातच त्यांचे पुनर्वसन होईल. माळीणची घटना वृक्षतोड किंवा इतर मानवी हस्तक्षेपांमुळे घडली असावी का याबद्दल चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने वन खात्याचा तसेच जलसंपदा विभागाचा अहवाल मागवण्यात आला असून तो येत्या २ दिवसांत प्राप्त होईल.’’
 
दरडींच्या धोक्याबाबतही आता ‘ब्लू’, ‘रेड’
ज्याप्रमाणे पूरपरिस्थिती उद्भवण्याच्या दृष्टीने असुरक्षित असणाऱ्या जागा ‘ब्लू लाइन’ आणि ‘रेड लाइन’ सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात येतात, त्याच प्रकारे दरड कोसळण्याच्या दृष्टीने धोक्याच्या गावांचीही यादी तयार करू, असेही जिल्हाधिकारी राव म्हणाले.
 
‘एनडीआरएफ’कडून अत्याधुनिक ‘लाइफ डिटेक्टर’चा वापर
माळीण दुर्घटनेतील बचावकार्यात जखमींना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी मानवी हृदयाचे ठोके (ह्य़ूमन हार्ट फ्रीक्वेन्सी) अचूक पकडणाऱ्या ‘लाइफ डिटेक्टर’ या अत्याधुनिक उपकरणाची मदत घेतल्याची माहिती चीफ कमांडंट आलोक अवस्थी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘एक फूट लांबीच्या गनसारख्या दिसणाऱ्या या उपकरणावर लावलेला सेन्सर धडधडणाऱ्या हृदयाचे ठोके अचूक पकडतो. जीएसआय सर्वेक्षणाला मदत करण्यासाठी परिसराचे उंचावर उडून छायाचित्रण करणारे ‘नेत्रा यूएव्ही’ हे उपकरणही वापरण्यात आले. माळीणमध्ये सतत पाऊस सुरू असल्यामुळे त्याचा वापर केवळ जीएसआयसाठी मर्यादित ठेवावा लागला. खूप मोठय़ा दुर्घटनांमध्ये सर्व मृतदेह सापडणे शक्य होत नाही. मात्र माळीण दुर्घटनेत एनडीआरएफचे (नॅशनल डिझास्टर रीस्पॉन्स फोर्स) जवान शंभर टक्के मृतदेह बाहेर काढू शकले.’’