पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे निलख येथील भाजपचे नगरसेवक तुषार गजानन कामठे यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. तुषार कामठे यांच्यावर खोटी कागदपत्रे दाखल करुन निवडणूक लढवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामठे यांनी बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथील कामठे यांनी महानगरपालिकेची निवडणूक लढवताना खोटी कागदपत्रे सादर केली होती. याप्रकरणी २७ ऑक्टोबरला त्यांच्यावर सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून कामठे पसार झाले आहेत. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे कामठे यांना कधीही अटक होऊ शकते, अशी माहिती सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांनी दिली
काँग्रेसचे सचिन साठे यांनी सांगवी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली होती. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता बारावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. कामठे यांनी डेक्कन येथील एम. एम. विद्यालयात शिकत असताना अकरावीच्या वर्गात ते अनुतीर्ण झाले होते. मात्र, बारावी उत्तीर्ण असल्याच्या दाखला सादर करुन सांगवी येथील घोलप महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. हेच प्रमाणपत्र त्यांनी निवडणुकीच्या काळात सादर केले होते. कामठे हे पिंपळे निलख येथील प्रभाग क्रमांक २६ (ब) येथून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे सचिन साठे उभारले होते. कामठे यांनी साठे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.