यंदा उत्पादन, अभियांत्रिकी, पायाभूत सोयी-सुविधा अशा काही क्षेत्रात सुमारे ५८ हजार २०० नवे रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक संधी पुण्यात (९ हजार १५०) निर्माण होणार असून, त्यापाठोपाठ मुंबई (८ हजार ९४०) आणि बेंगळुरू (८ हजार ५१) या शहरांचा क्रमांक लागतो. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

उद्योग क्षेत्राला मनुष्यबळ पुरवणाऱ्या ‘टीमलीज सव्‍‌र्हिसेस’च्या २०१९-२० या आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीसाठीच्या ‘एम्प्लॉयमेंट आउटलुक’ या अहवालातून ही माहिती देण्यात आली. या अहवालात देशभरातील ७७५ उद्योग, जगभरातील ८५ उद्योगांची पाहणी करण्यात आली. उत्पादन, अभियांत्रिकी आणि पायाभूत सोयी-सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक, उत्पादन वाढ ही नव्या रोजगार संधी निर्माण होण्याची कारणे आहेत.

प्रवास आणि आतिथ्य, बीपीओ, ऊर्जा, अर्थविषयक सेवा, शिक्षण, उत्पादन, अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर विपणन आणि जाहिरात, शेती, दूरसंचार, आरोग्य सेवा, माहिती तंत्रज्ञान, माध्यमे आणि मनोरंजन, ई-कॉमर्स अशा काही क्षेत्रातही रोजगार संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यम आकाराच्या व्यवसायांमध्ये नवीन नोकऱ्या निर्माण होण्याचे प्रमाण ५ टक्क्य़ांनी, मोठय़ा व्यवसायात २ टक्के आणि लघु व्यवसायात १ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

रोजगारसंधींमध्ये सकारात्मक वाढ असलेली शहरे

पुणे, कोइम्बतूर, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली

रोजगार संधी नकारात्मक असलेली शहरे

मुंबई, चंडीगड, नागपूर, बेंगळुरू, हैदराबाद, गुडगाव, कोची

नवपदवीधरांसाठी १७ टक्के रोजगारसंधी

नवीन नोकऱ्यांपैकी १७ टक्के नोकऱ्या नवीन पदवीधरांसाठी असतील. त्यामध्ये दिल्ली आणि चेन्नईमध्ये रिटेल क्षेत्रात, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये शैक्षणिक सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये नवपदवीधरांना संधी असेल असेही अहवालात नमूद केले आहे.