पर्वती, वडगावशेरी, कसबा मतदार संघाचीही गिरीश बापट यांना चांगली साथ

पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत येत असलेल्या शहरातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी कोथरूड मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे. कोथरूडमधून बापट यांनी तब्बल १ लाख ६ हजार १९६ मतांची आघाडी घेतली. त्यापाठोपाठ पर्वती मतदार संघातून बापट यांना ६६ हजार ३३२, वडगावशेरी मतदार संघातून ५६ हजार ८२१, तर कसब्यातून ५२ हजार ३९१  एवढे मताधिक्य मिळाले.

कोथरूड

विद्यमान आमदार-

प्रा. मेधा कुलकर्णी, भाजप

बापट यांना १ लाख ६ हजार १९६ मतांची आघाडी

कोथरूड विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपचे अनिल शिरोळे यांना मोठे मतदान झाले होते. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढली. त्यामुळेच बापट यांच्या प्रचाराची सुरुवात या मतदार संघातून झाली. त्याचा फायदा बापट यांना लोकसभा निवडणुकीत झाला. शिवसेनेची ताकद आणि त्या पक्षाबरोबर झालेल्या युतीचा फायदा होऊन बापट यांना मताधिक्य देण्यात कोथरूड मतदार संघ अव्वल ठरला. या मतदार संघातून बापट यांना एकूण १ लाख ४८ हजार ५७० मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना ४२ हजार ३७४ मते मिळाली.

पर्वती

विद्यमान आमदार-

माधुरी मिसाळ, भाजप

बापट यांना ६६ हजार ३३२ मतांची आघाडी

पर्वती विधानसभा मतदार संघातून बापट यांना १ लाख १६ हजार ८९९ मते मिळाली असून मोहन जोशी यांना ४२ हजार ३७४ मतदान झाले आहे. या मतदार संघात शतप्रतिशत भाजपचे नगरसेवक आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरदार प्रचारामुळे बापट यांचे या मतदार संघातील मताधिक्य थोडे घटल्याचे दिसून आले. या मतदार संघातील बापट यांचे मताधिक्य थोडे घटले असले तरी कोथरूड नंतर मताधिक्य देणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा मतदार संघ ठरला आहे. विशेष म्हणजे जोशी यांना सहा मतदार संघांपैकी  सर्वाधिक मतदान या मतदार संघातून झाले आहे.

वडगावशेरी

विद्यमान आमदार-

जगदीश मुळीक, भाजप

बापट यांना ५६ हजार ८२१ मतांची आघाडी

वडगावशेरी मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे जगदीश मुळीक आमदार आहेत. तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची येथे मोठी ताकद आहे. यापूर्वी या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयी झाले होते. तसेच या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्याही मोठी होती. त्यामुळे या मतदार संघातून मोहन जोशी यांना मोठे मतदान होईल, असा दावा केला जाता होता. प्रचारातही जोशी यांचा या मतदार संघात सर्वाधिक भर राहिला होता. मात्र या मतदार संघातून बापट यांना जोशी यांच्यापेक्षा जास्त मतदान झाले. या मतदार संघातून बापट यांनी १ लाख १७ हजार ६६४ मते मिळविली असून जोशी यांना ६० हजार ८४३ मते मिळाली.

शिवाजीनगर

विद्यमान आमदार-

विजय काळे, भाजप

बापट यांना २९ हजार ५३२ मतांची आघाडी

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना तुलनेने बऱ्यापैकी मतदान झाले. बापट यांना या मतदार संघातून फारसे मताधिक्य मिळणार नाही, मोहन जोशी या मतदार संघात आघाडीवर राहतील, असा दावा केला जात होता. बापट यांना ७७ हजार ९८२ मते मिळाली, तर जोशी यांना ४८ हजार ४५० मते मिळाली. या मतदार संघातील बापट यांची आघाडी २९ हजार ५३२ एवढी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या शिवाजीनगर मतदार संघात बापट यांनी तुलनेने चांगली मते घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट

विद्यमान आमदार-

दिलीप कांबळे, भाजप

बापट यांना १२ हजार ७३३ मतांची आघाडी

सन २०१४ पूर्वीपर्यंत या मतदार संघात काँग्रेसची ताकद होती. पुणे कॅन्टोन्मेंट मध्येही काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्याच जास्त होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे हे याच मतदार संघातून यापूर्वी निवडून आले होते. या मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य मिळेल, असा दावा मोहन जोशी यांनी केला होता. पुणे कॅन्टोन्मेंटमधून बापट यांना ६७ हजार १७७ मते मिळाली, तर जोशी यांना ५५ हजार ४४४ मते मिळाली. या मतदार संघातून बापट यांना १२ हजार ७३३ अशी मतांची आघाडी मिळाली आहे.

कसबा पेठ

विद्यमान आमदार-

गिरीश बापट, भाजप

बापट यांना ५२ हजार ३९१ मतांची आघाडी

लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले बापट हे याच मतदार संघातून विधानसभा निवडणुकीत पाच वेळा विजयी झाले आहेत. बहुतांश विधानसभा निवडणुकीत बापट यांना कसब्यातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. भाजपचा बालेकिल्ला अशी या मतदार संघाची ओळख आहे. कसब्यातून बापट यांना १ लाख ३ हजार ५८३ मते मिळाली, तर मोहन जोशी यांना ५१ हजार १९२ मते मिळाली. त्यामुळे या मतदार संघातून बापट यांना ५२ हजार ३९१ एवढे मताधिक्य मिळाले.