पुणे रेल्वे स्थानकावरील घटना; महिलेला मुंबईतून अटक

बालकाला घेऊन भीक मागितल्यास जास्त भीक मिळत असल्याच्या कारणावरून एका भिकारी महिलेने पुणे रेल्वे स्थानकावरून चार महिन्याच्या बालकाचे अपहरण केले. संबंधित आरोपी महिलेला पोलिसांनी मुंबईच्या जोगेश्वरी भागातून ताब्यात घेतले आहे. स्थानकात आईजवळ झोपलेल्या या बालकाला तिने १७ ऑगस्ट रोजी पळवून नेले होते.

मनीषा महेश काळे (वय २५, रा. हडपसर रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टी, मूळ रा. भिंगार, नगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता आनंद कंद (वय २५ रा. कोपार्डे, कोल्हापूर) ही महिला पंधरा दिवसांपासून पुण्यात कामाच्या शोधात आली होती. तिच्या पतीचे निधन झाले आहे. दिवसभर भीक मागून ती रात्री स्थानकाच्या परिसरातच झोपत होती. १७ ऑगस्टला फलाट क्रमांक दोनजवळील पुस्तकाच्या दुकानाशेजारी ती बालकासह झोपली होती.

त्यावेळी तिच्याजवळून बालकाला उचलून नेण्यात आले. याबाबत तिने लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी स्थानकाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली असता, एका भिकारी महिलेने बालकाला उचलून नेल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी शहरातील उद्याने, मंदिरे, मंडई आदी भागात भिकाऱ्यांकडे माहिती घेतली. मात्र, आरोपी महिलेचा शोध लागला नाही.

संबंधित महिलेबाबत मुंबईसह इतर लोहमार्ग पोलिसांना माहिती देण्यात आली.

आरोपी मनीषा काळे बालकाला घेऊन मुंबईच्या जोगेश्वरी भागात भीक मागण्यासाठी गेली होती. ती एका रेल्वे पुलाखाली राहत होती. तिच्याकडील बालक सातत्याने रडत असल्याने एका महिलेला तिचा संशय आल्याने तिने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे मुंबई लोहमार्ग पोलिसांनी काळे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता बालकाच्या अपहरणाचा प्रकार उघडकीस आला.