X

औषध खरेदीची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – डॉ. अभिजित वैद्य

रुग्णालये औषधांच्या दर्जासाठी त्यांच्याच दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती करतात, हा दावा खोटा आहे.

‘रुग्णालये औषधांच्या दर्जासाठी त्यांच्याच दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती करतात, हा दावा खोटा आहे. रुग्णालयातील औषध दुकानांची उलाढाल मोठी असून रुग्णालय व्यवस्थापन त्यातून लाखो रुपये मिळवते, त्यामुळे रुग्णालयातूनच औषध खरेदी करण्याची केली जाणारी सक्ती ही अर्थकारणासाठी असते व अशा रुग्णालयांवर कारवाई व्हायला हवी,’ असे मत ‘आरोग्य सेने’चे प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केले. औषधखरेदी सक्तीच्या विषयावर संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य अदालतीमध्ये ते रविवारी बोलत होते.

डॉ. नितीन केतकर, लक्ष्मीकांत मुंदडा, आशिष आजगावकर, प्रा. प्रमोद दळवी, वर्षां गुप्ते, डॉ. पंडित बोबडे या वेळी उपस्थित होते. डॉ. वैद्य म्हणाले, ‘गंभीर रुग्णाच्या उपचारांमधील खर्चापैकी मोठा भाग औषधांच्या खर्चाचा असतो. रुग्णालयांनी त्यांच्याच औषध दुकानातून औषध खरेदीची सक्ती केल्यास त्यांना ती परवडत नसतानाही चढय़ा दरात घ्यावी लागतात व या ताणामुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारीही होतात. प्रत्येक रुग्णाला जिथे औषधे दर्जेदार व स्वस्त मिळतील अशा ठिकाणाहून खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे व या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली गेली पाहिजे. दर्जेदार व मान्यताप्राप्त कंपन्यांची जेनेरिक औषधे घेण्याचीही परवानगी रुग्णांना असायला हवी.’

First Published on: January 11, 2016 3:31 am
  • Tags: hospitals, medicine, purchase,