News Flash

भाडेकरू नोंदणीबाबत निरुत्साह

भाडेतत्त्वावर खोल्या देण्यापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव भाडेकरू नोंदणी करणे गरजेचे आहे

प्रातिनिधिक छायाचित्र

पोलिसांच्या सूचनांकडे घरमालकांकडून दुर्लक्ष

पुणे शहरात अनेकांनी गुंतवणूक म्हणून सदनिका तसेच बैठय़ा चाळींमध्ये गुंतवणूक केली आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून अनेकांनी सदनिका खरेदी तसेच जागाखरेदीत पैसे गुंतवले. एक प्रकारे सामान्यांच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरले आहे. अनेकांनी सदनिका, बैठय़ा चाळीतील खोल्या भाडेतत्त्वावर वापरण्यास दिल्या आहेत. भाडेतत्त्वावर खोल्या देण्यापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव भाडेकरू नोंदणी करणे गरजेचे आहे, मात्र गेल्या वर्षभरात भाडेकरू नोंदणीचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले आहे.

पोलिसांकडून वेळोवेळी या बाबत आवाहनदेखील करण्यात आले आहे, मात्र घरमालकांकडून पोलिसांच्या सूचनांकडे काणाडोळा केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांकडून वर्षभरापूर्वी घरमालकांच्या सोयीसाठी भाडेकरू नोंदणीसंदर्भात एक पोर्टल (टेनेंट इन्फर्मेशन रजिस्ट्रेशन पोर्टल) सुरू करण्यात आले आहे. ९ डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत या पोर्टलवर फक्त ५० हजार ६१८ भाडेकरूंची नोंदणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसराचा विस्तार पाहता ही नोंदणी अतिशय कमी आहे. पोलिसांकडून भाडेकरू नोंदणीसंदर्भात वेळोवेळी आवाहन करण्यात आले आहे, मात्र एकंदरच भाडेकरू नोंदणीकडे घरमालक फारसे गांभीर्याने पाहात असल्याचा निष्कर्ष खुद्द पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी नोंदविला आहे.

यापूर्वी भाडेकरू नोंदणी करण्यासाठी घरमालकांना ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदनिका आहे, त्या पोलीस ठाण्यात जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यातून फॉर्म आणून तो भरून द्यावा लागायचा. त्यावर भाडेकरूंची छायाचित्रे, त्याचा वास्तव्याचा पुरावा आदी कागदपत्रे जोडावी लागत होती. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी घरमालकाला पोलीस ठाण्यात किमान दोन ते तीन हेलपाटे मारावे लागत होते. घरमालकांच्या सोयीसाठी पुणे पोलिसांकडून भाडेकरू नोंदणीसंदर्भात एक पोर्टल सुरू करण्यात आले, मात्र घरमालकांकडून भाडेकरू नोंदणीसंदर्भात निरुत्साही असल्याचे निरीक्षण पोलीस आयुक्त शुक्ला यांनी नोंदवले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसराचा विस्तार वाढत आहे. अनेक परप्रांतीय नोकरी-व्यवसायासाठी पुण्यात स्थिरावतात. पुण्यातील सदनिकांचे दर पाहता प्रत्येकाला सदनिका खरेदी करणे परवडत नाही, त्यामुळे अनेकांनी सिंहगड रस्ता, वारजे, कात्रज, आंबेगाव, हिंजवडी, वाकड, बावधन, कोथरूड, हडपसर, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात भाडेतत्त्वावर खोली किंवा सदनिका घेतली आहे. अनेक भाडेकरू एजंटमार्फत घरमालकाशी संपर्क साधतात, तसेच काही एजंट घरमालकांच्या संपर्कात असतात. एजंट आणि घरमालकांकडून भाडेकरूची इत्थंभूत माहिती ठेवली जात नाही.

भाडेकरू नोंदणी का गरजेची?

सदनिका भाडेतत्त्वावर देताना घरमालकांनी पोलिसांकडे भाडेकरू नोंदणी करणे गरजेचे आहे. घर भाडेतत्त्वावर दिल्यानंतर भाडेकरूची माहिती घेणे गरजेचे आहे, कारण  काही जण भाडेकरू म्हणून तात्पुरत्या कालावधीसाठी येतात. त्यापैकी काही जण गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे असतात. काही जणांकडून गैरप्रकार केले जातात. अशा वेळी पोलिसांना मिळालेल्या पत्त्यावरून तपास सुरू केला जातो. घरमालकाला भाडेकरूची पाश्र्वभूमी माहीत नसते. त्यामुळे अशा वेळी भाडेकरू नोंदणी करणे फायदेशीर ठरते आणि पोलिसांकडून घरमालकाविरुद्ध होणारी कारवाई टाळता येते. कारण यापूर्वी पुणे शहरात घडलेल्या बॉम्बस्फोटातील संशयित भाडेतत्त्वावर वास्तव्यास होते. जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोटातील संशयित कासारवाडी परिसरात वास्तव्यास होते. त्यांची नोंदणी घरमालकांकडून करण्यात आली नव्हती, त्यामुळे पोलिसांकडून भाडेकरू नोंदणी करण्याबाबत वेळोवेळी आवाहन करण्यात येते, मात्र या आवाहनाला घरमालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती पुढे आली आहे.

भाडेकरू नोंदणी 

नोंदणी कालावधी                                                         भाडेकरूंची संख्या

डिसेंबर २०१६ ते डिसेंबर २०१७                              ५० हजार ६१६ नोंदणीकृत भाडेकरू

(पुणे आणि पिंपरी शहरातील आकडेवारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 3:43 am

Web Title: house owner ignoring police instruction over renting noc
Next Stories
1 मंदिरांना वार्षिक एक हजार रुपयांचे दिवाबत्ती अनुदान
2 वाहतूक पोलिसांची सायकलवरून गस्त
3 शहरबात : ‘स्वच्छ पुणे’साठी धावपळ
Just Now!
X