भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मोठी घोषणा केली आहे. देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली आहे. पुण्यात अनेक नेते घडले आहेत. कुठेही काही घटना घडली की त्याचं नातं पुण्याशी जोडलं जातं. पुणे सगळ्या अर्थाने प्रगतीचं शहर आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते की, पुण्यामध्ये सेटल झाले पाहिजे पण देवेंद्रजी मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. हे माझ्या विरोधकांना सांगून टाकतो असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आणि सभागृहात एकच हशा पिकला.

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने आज पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नेहमी प्रमाणे खासदार गिरीश बापट यांनी चांगलीच बॅटिंग केली.याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी ही मोठी घोषणा केली.

अटल संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट भाषण करताना म्हणाले की “जगाच्या पाठीवर कुठे काही होऊद्या आमच्या पुण्याचे लोक इतके हुशार आहेत की, त्या व्यक्तीचा आणि पुण्याचं कनेक्शन कसे हे लगेच जोडतात.”  अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. जो बायडेन राष्ट्रपती झाले. तर लगेच एका पुण्याच्या व्यक्तीने जोडले राष्ट्रपती जो बायडेन हे पुण्याचे पूर्वीचे भिडे होते.अहो इंदिरा गांधी पुण्याच्या हुजुरपागा शाळेत शिकल्या आणि बर का देवेंद्र तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कारण तुमचे काका पुण्याचे असे म्हणताच सभागृहात एकच पिकला.

माशेलकर सर हे नुसतेच रसायनशास्त्रज्ञ नाहीत तर ते रसायनच वेगळं : देवेंद्र फडणवीस

डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार माझ्या हस्ते केल्याने माझा बायोडाटा समृद्ध झाला आहे. तसेच आज अटलजींच्या नावाने माशेलकर सरांना गौरविले जात आहे. ती समाधानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अटलजी हे देशाला पडलेले एक स्वप्न असून संवेदनशील कवी मनाचे अटलजी होते. त्यांनी देशासह, जगाला त्यांच्या कामातून संदेश देण्याचे काम केले आहे. हे सर्वांच्या कायम स्मरणात राहणारे असल्याची भावना माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.  तसेच ते पुढे म्हणाले की, माशेलकर सर हे नुसतेच रसायनशास्त्रज्ञ नाहीत तर ते रसायनच वेगळं आहे.

महात्मा गांधीजींचा विचार हा किती वस्तुनिष्ठ आहे ते सरांनी मांडण्याचे काम केले आहे.  तर अटलजींनी माशेलकर समिती नेमली. त्यामध्ये अनेक जबाबदाऱ्या टाकल्या त्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या.  आज आपण एका कर्मयोग्याच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या कर्मयोग्याला देत असल्याचे त्यांनी सांगितले.