कौन्सिल फॉर द स्कूल सर्टिफिकेशन एक्झामिनेशनने (सीआयएससीई) दहावी (आयसीएसई) आणि बारावीच्या (आयएससी) ४ मे पासून होणाऱ्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. आता परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षांबाबतचा निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतला जाणार असून दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांसह परीक्षा देण्याचा किंवा परीक्षा न देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. सीआयएससीईने दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबतचे परिपत्रक शुक्रवारी प्रसिद्ध केले. या परिपत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात परीक्षांबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांसह परीक्षा देण्याचा किं वा परीक्षाच न देण्याचा पर्याय असेल. परीक्षा न देण्याचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीआयएससीईकडून योग्य आणि निष्पक्ष निकष ठरवण्यात येतील, असे सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी आणि सचिव गॅरी अ‍ॅराथून यांनी स्पष्ट केले आहे.