कर चोरी प्रकरणाचा आरोप असलेल्या दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू मागे आयकरचा ससेमिरा सुरूच आहे. ३ मार्च रोजी आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग, तापसीसह मधू मंटेना आणि विकास बहल यांच्याविरोधात छापेमारीची मोहीम हाती घेतली होती. फँटम फिल्म प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या या सेलिब्रिटींची चौकशी सुरूच असून, अनुराग, तापसीची पुण्यात चौकशी केल्यानंतर आता पिंपरी चिंचवडमधील हॉटेलमध्येही पुन्हा चौकशी केली जात आहे.
फँटम फिल्मला अधिकचा नफा झालेला असताना कमी दाखवून कर चोरी केल्याच्या आरोपाखाली सध्या आयकर विभागाकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, फँटम फिल्मचा सहसंस्थापक विकास बहल, गुणवत्ता व्यवस्थापन कंपनी क्वानचा मधू मंटेना यांच्या मालमत्तांवर आयकरच्या पथकांनी ३ मार्च रोजी छापे टाकले. त्याच दिवशी मध्यरात्रीपर्यंत अनुराग आणि तापसी पुण्यात चौकशी करण्यात आली होती.
प्राप्तिकर विभागाने दोन चित्रपट कंपन्या, दोन गुणवत्ता व्यवस्थापन कंपन्या आणि आघाडीच्या अभिनेत्रीच्या निवासस्थानावर छापे टाकून ६५० कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता उघडकीस आणली असल्याचा दावा गुरुवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केला होता. मात्र मंडळाकडून कोणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र या प्रकरणाचा तपास सुरूच असून, आयकर विभागाकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पंनूची अद्याप सुरूच आहे.
अनुराग आणि तापसी पुण्यातील वेस्टीन हॉटेलमधून पिंपरी चिंचवडमधील सयाजी हॉटेलमध्ये शिफ्ट झाले. तिथंही आयकर विभागाकडून चौकशी केली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. अनुराग, तापसीसह आयकर विभागाचे अधिकारी हॉटेल सयाजीमध्ये येऊन थांबलेले आहेत. ते इथं कधीपासून आहेत आणि कधीपर्यंत असतील, याबाबत हॉटेल व्यवस्थापनाकडून गुप्तता पाळली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 5, 2021 4:06 pm