करोनाकाळात कंपन्यांकडून शासकीय नियमांचे उल्लंघन, कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

पिंपरी : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडसह लगतच्या औद्योगिक परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने उद्योग क्षेत्राची चिंताही वाढली आहे. चाकणच्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एकाच वेळी ११० कामगारांना करोना झाल्याने हा विषय ऐरणीवर आला आहे. अनेक कंपन्यांकडून शासकीय नियमांचे पालन होत  नसल्याचे सांगत शासकीय यंत्रणेने कारवाईचा इशारा दिला आहे.

चाकणच्या या कंपनीतील काही जणांना करोना संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्याने कंपनीने ८०० कामगारांची चाचणी केली. त्यापैकी ११० जणांना करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. हे बाधित कामगार पिंपरी-चिंचवड, खेड, मावळ, हवेली भागातील रहिवासी होते. चाकणच्या या घटनेने संपूर्ण औद्योगिक पट्टय़ात  खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये यापूर्वीच करोनाची लागण झाली आहे. उद्योगनगरीचा कणा मानल्या जाणाऱ्या मोठय़ा उद्योगसमूहातही जवळपास २५० रुग्ण  करोनाबाधित आहेत. त्याची दखल घेत या कंपनीने काही कठोर नियम लागू केले आहेत. खबरदारी म्हणून ५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील जोखमीच्या आजारांची पार्श्वभूमी असणाऱ्या कामगारांना कंपनीत येण्यास मनाई केली आहे. याशिवाय, अनेक छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. त्याची दखल घेत महापालिका तसेच एमआयडीसी प्रशासनाकडून अधिक खबरदारी बाळगण्याचे आवाहन कंपन्यांना करण्यात आले आहे.

या संदर्भात पालिकेचे सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले की, औद्योगिक पट्टय़ात करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अनेक कंपन्यांकडून शासकीय नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रादुर्भावाची प्रमुख कारणे काय?

* कंपन्यांकडून शासकीय नियमांचे, आरोग्यनियमांचे उल्लंघन

* प्रतिबंधित क्षेत्रातील कामगारांची कामावर नियुक्ती

* बस वाहतुकीत, कंपन्यांच्या आवारात आणि उपाहारगृहांमध्ये होणारी गर्दी

* कामगारांच्या सुरक्षेकडे कंपनी व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

* काही ठिकाणी कामगारांकडून नियमांचे उल्लंघन

कंपन्यांनी शासन नियमांचे पालन  करणे आवश्यक आहे. कामगारांची सुरक्षा ही कंपन्यांची जबाबदारी असून त्यांनी ती सुयोग्य पद्धतीने पाळली पाहिजे. शासनाच्या आदेशानुसार, कृती पथकाची स्थापना करण्यात आली असून औद्योगिक पट्टय़ावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद