उद्योगांची व कामगारांची नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडला १९८६ च्या सुमारास हरनामसिंह नावाचे आयुक्त लाभले, तेव्हापासून शहराने घेतलेला ‘हिरवाई’चा वसा आजही कायम आहे. गाव तेथे शाळा असते, त्या पध्दतीने प्रत्येक प्रभागात उद्यान उभारण्याचा संकल्प महापालिकेने केला आणि एकेक करत आतापर्यंत १५४ उद्याने बांधल्याने ‘उद्यानांचे शहर’ हा अघोषित किताब मिळाला. याबाबत कौतुक होत असले, तरी आता अडचणींचा मोठा डोंगर उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुरेसे पैसे नाहीत, कर्मचारी नाहीत, देखभालीसाठी माळी-मजूर नाहीत, उद्यानांमध्ये वाढलेल्या चोऱ्या या प्रश्नांनी उद्यानांना ग्रासले आहे.. तरीही महापालिकेतर्फे सर्व काही आलबेल असल्याच्या थाटात ‘कागदी घोडे’ नाचवले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात दुर्गादेवी, शाहू उद्यान, बर्ड व्हॅली, भोसरी तळे, गणेश तलाव, साई उद्यान, ज्ञानेश्वर उद्यान, सर्पोद्यान, सीतांगण, आई उद्यान, शिवसृष्टी, राजमाता जिजाऊ उद्यान, बोट क्लब, जोग उद्यान अशी लहान-मोठी १५४ उद्याने आहेत. २४ उद्याने तयार होत असून १५ ठिकाणी उद्याने उभारण्याचे नियोजन आहे. आयुक्त हरनामसिंह यांच्या काळात वृक्षारोपण मोहीम सुरू झाली. तिला श्रीनिवास पाटील यांच्या काळात आणखी चालना मिळाली. अगदी अलीकडे दिलीप बंड व आशिष शर्मा यांच्या काळात सर्वाधिक उद्याने झाली. पूर्वी केवळ सात-आठ उद्याने व काही हजार वृक्षसंख्या असणाऱ्या शहरातील वृक्षसंख्या आजमितीला २० लाखांच्या घरात आहेत. चऱ्होली, मोशी, किवळे, पुनावळे, ताथवडे अशा १८ प्रभागांमध्ये उद्याने नाहीत, ती झाल्यास प्रभागनिहाय उद्यानांचा जुना संकल्प मार्गी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या उद्यान विभागाला हा पसारा सांभाळणे अवघड जात आहे. खूपच कमी तरतूद आहे. कर्मचाऱ्यांची, विशेषत: सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. माळ्यांची कमतरता असल्याने बराच त्रास आहे. सुरक्षा विभागाच्या कामांसाठी माणसे पुरत नाहीत, तेव्हा त्यांनी इतरांना मनुष्यबळ पुरवावे, ही अपेक्षाच गैर आहे. उद्यान विभागातील कर्मचारी निवृत्त होत जातात. रिक्त जागांवर नवे मिळत नाहीत. उद्यानांमधील स्थापत्याची कामे होतच नाहीत. दुरुस्त्यांची कामे रखडून पडतात. एखादी फरशी बसवायची असली तरी पत्र-पत्र खेळावे लागते. पालिकेच्या महत्त्वपूर्ण विभागांमध्ये समन्वय नाही आणि खापर उद्यान विभागावर फोडले जाते. आता ही परिस्थिती बदलली पाहिजे, हे नक्की. मात्र, ते करणार कोण, असा प्रश्न आहे.

दलाली आणि चोऱ्यामाऱ्यासुद्धा!
महापालिकेच्या उद्यान उद्यानांमध्ये सगळे काही आलबेल आहे का?.. बिलकूल नाही. नको इतकी खाबुगिरी आहे. ठेकेदारीत दलाली चालतेच. ठराविक ठेकेदारांची मक्तेदारी आहे, अधिकारी त्यांचे भागीदार आहेत. उद्यानातील झुकझुक गाडय़ा बंद असतात. कारंजी बांधली जातात, पण तेथे पाणी नसते. माती-मुरूम, पिंजरे गायब होतात. रोपे, झाडे विकली जातात. अनेक घोषणा हवेतच विरतात.