‘जिनोम इंडिया’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू

पुणे : सांस्कृतिक, सामाजिक वैविध्य असलेल्या भारताचा पहिल्यांदाच जनुकीय नकाशा तयार करण्यात येणार आहे. जैवतंत्रज्ञान विभागातर्फे ‘जिनोम इंडिया-कॅटलॉगिंग द जेनेटिक व्हेरिएशन्स इन इंडियन्स’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे भारतीयांच्या आरोग्याचे विश्लेषण केले जाणार असून, देशाचे वैद्यकीय धोरण ठरवण्यासाठी हा प्रकल्प मूलगामी ठरू शकेल.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून जानेवारीमध्ये जिनोम इंडिया या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे. तर बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील सेंटर फॉर ब्रेन रीसर्चच्या संचालिका प्रा. विजयालक्ष्मी रवींद्रनाथ प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक आहेत.

जगभरातील अनेक प्रगत देशांनी जिनोम संबंधित मोठे प्रकल्प राबवले आहेत. जिनोम इंडिया प्रकल्पातून आता भारतही त्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. गेल्या दशकात देशात जनुकीय क्षेत्रांत काही प्रकल्प राबवण्यात आले. मात्र राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच राबवल्या जात असलेल्या या प्रकल्पात देशभरातील नामवंत बावीस संशोधन संस्थांचा सहभाग आहे, अशी माहिती प्रकल्पातील वरिष्ठ संशोधक, सेंटर फॉर ट्रान्स्लेशनल कॅन्सर रीसर्चचे डॉ. संतोष दीक्षित यांनी दिली.

प्रकल्पातील वरिष्ठ संशोधक, ‘आयसर पुणे’च्या डॉ. मयूरिका लाहिरी म्हणाल्या, की यात वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान, जनुकशास्त्र, मानवशास्त्र, विदा विश्लेषण अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग आहे. देशभरातील बारा रुग्णालयांच्या माध्यमातून त्या भागातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करून जनुकीय विश्लेषण केले जाईल. बंगळुरुचे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलर मॉलिक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी), कोलकात्याचे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल जिनॉमिक्स (एनआयबीएमजी), दिल्लीचे इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स इंट्रागेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) येथे हे जिनोम सिक्वेन्सिंग केले जाईल.

लोकसहभाग महत्त्वाचा..

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील १८ ते ७० या वयोगटातील सुमारे बाराशे निरोगी नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित केले जातील. त्या नमुन्यांची वैद्यकीय तपासणी करून सहभागी झालेल्या नागरिकांना त्याचे अहवाल मोफत दिले जातील. राज्यभरातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्याची प्रक्रिया पुण्यात सुरू झाली आहे. देशाच्या वैद्यकीय व जैवतंत्रज्ञान संशोधनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पात लोकसहभाग आवश्यक आहे. प्रकल्पात सहभागी होण्यासाठी researchadmin@prashanticancercare.org या ई-मेलवर संपर्क साधावा, असे प्रकल्पातील वरिष्ठ संशोधक डॉ. संतोष दीक्षित यांनी सांगितले.

जनुकीय नकाशा म्हणजे काय?

रक्ताच्या नमुन्यांचे संकलन करून हिमोग्राम, मेदाचे प्रमाण, शर्करेचे प्रमाण, यकृत आणि मूत्रपिंड कार्यक्षमता, रक्तदाब असे विश्लेषण केले जाईल. त्यानंतर रक्तातून डीएनए वेगळा करून सुमारे चोवीस हजार जनुकांचं पृथ:करण केले जाईल. अशा पद्धतीने दहा हजार व्यक्तींची माहिती संकलित झाल्यावर जनुकीय नकाशा तयार होईल. त्यावरून भारतीय रोग-विकारांचे स्वरूप, त्याची मूलभूत जनुकीय कारणे याचा शोध घेता येईल.

देशाच्या १३० कोटी लोकसंख्येत सुमारे साडेचार हजार वांशिक समूह आहेत. जिनोम इंडिया प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील दहा हजार निरोगी नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. त्यातून भारतीयांच्या जनुकीय वैविध्याचा प्राथमिक अंदाज येईल. भारतातील जैववैद्यकीय संशोधनाच्या दृष्टीने जिनोम इंडिया हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.       – प्रा. एल. एस. शशिधरा, जिनोम इंडिया प्रकल्पाचे सहमुख्य संशोधक