विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार का नाही याबाबत अद्याप निर्णय होत नसल्यामुळे काँग्रेसनेही आता सर्व जागांसाठी मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला असून गेल्यावेळी राष्ट्रवादीने ज्या ११४ जागा लढवल्या होत्या त्या जागांवर इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती रविवारी मुंबईत टिळक भवनात होणार आहेत. या मुलाखतींसाठी पर्वती, कोथरूड, वडगावशेरी, खडकवासला या मतदारसंघातील इच्छुक समर्थकांसह जाणार आहेत.
राष्ट्रवादीच्या कोटय़ातील ११४ मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी जाहीर केले. त्यानुसार दादर येथील टिळक भवनात या ११४ मतदारसंघातील इच्छुकांबरोबर काँग्रेसचे नेते चर्चा करणार आहेत. सकाळी दहा ते रात्री आठ अशी या चर्चेची वेळ असून प. महाराष्ट्रासाठी दुपारी चार ते सहा ही वेळ देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जागांसाठी मुलाखती घेतल्यामुळे काँग्रेसनेही सर्व जागांसाठी मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांकडून अद्याप आघाडी होणार अशीही विधाने केली जात आहेत.
पुण्यातील पर्वती, कोथरूड, वडगावशेरी आणि खडकवासला हे चार मतदारसंघ गेल्यावेळी राष्ट्रवादीने लढवले होते. काँग्रेसने जाहीर केल्याप्रमाणे या चारही मतदारसंघातील इच्छुक रविवारी मुंबईत मुलाखतीसाठी समर्थकांसह जाणार आहेत. या मुलाखतींसाठी इच्छुकांनी एकटय़ानेच यावे. समर्थक वा शिफारसींसह मुलाखतींना उपस्थित राहू नये, असेही प्रदेश काँग्रेसने कळवले आहे. मात्र इच्छुक त्यांच्या समर्थकांसह मुलाखतीला जातील असा अंदाज आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Aug 2014 रोजी प्रकाशित
पर्वती, कोथरूड, वडगावशेरीतील काँग्रेस इच्छुकांच्या आज मुलाखती
गेल्यावेळी राष्ट्रवादीने ज्या ११४ जागा लढवल्या होत्या त्या जागांवर इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती काॅंग्रेसकडून रविवारी मुंबईत टिळक भवनात होणार आहेत.
First published on: 31-08-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interviews of congress candidates from parvati kothrud vadgaonsheri